दुहेरीत गेरार्ड व अँड्रियन विजेते

अग्रमानांकनाला साजेसा खेळ करीत युकी भांब्री या भारतीय खेळाडूने केपीआयटी एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. दुहेरीत गेरार्ड ग्रॅनोलर्स व अँड्रियन मॅसिरिआस या स्पॅनिश जोडीस विजेतेपद मिळाले.
शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत युकी याने इंग्लंडचा डेव्हिसपटू जेम्स वार्ड याचे आव्हान ७-६ (८-६), ६-३ असे परतविले. दुहेरीच्या अंतिम सामन्यात गेरार्ड व अँड्रियन यांनी दिविज शरण व मॅक्समिलियन न्यूख्रिस्ट यांचा १-६, ६-३, १०-६ असा संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभव केला. युकी याने चौथा मानांकित जेम्स याला एक तास २४ मिनिटे चाललेल्या लढतीनंतर पराभव केला. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी वेगवान सव्‍‌र्हिस व परतीचे फटके असा चतुरस्त्र खेळ केला. दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सव्‍‌र्हिस राखल्यानंतर टायब्रेकरचा उपयोग करण्यात आला. त्यामध्येही चुरस पाहावयास मिळाली. युकीने ५-१ अशी आघाडी मिळविली होती. मात्र जेम्सने चिवट लढत देत ६-५ अशी आघाडी मिळविली. मात्र युकीने ८-६ असा टायब्रेकर घेत पहिला सेट मिळविला. दुसऱ्या सेटमध्ये युकी याने आठव्या गेमच्या वेळी सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. या ब्रेकच्या आधारे त्याने आघाडी राखून दुसरा सेट घेत सामना जिंकला. त्याने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा बहारदार खेळ केला. तसेच त्याने नेटजवळून प्लेसिंगचाही कल्पकतेने उपयोग केला.
‘अंतिम फेरीत स्थान मिळविण्याचा मला आत्मविश्वास होता. मात्र जेम्सने सुरेख खेळ करीत मला चिवट झुंज दिली. अंतिम लढतीत अशीच सर्वोत्तम कामगिरी करण्याची मला खात्री आहे. विजेतेपद मिळवीत पुन्हा पहिल्या शंभर मानांकनात स्थान मिळविण्यासाठी मी उत्सुक आहे’, असे युकीने सांगितले.