डेव्हिस चषकात भारतासमोर सर्बियाचे आव्हान आहे हे ठरल्यावर विजेता कोण असेल याचा अंदाज टेनिसपंडितांनी वर्तवला होता. अपेक्षेप्रमाणे सर्बियाने विजय मिळवला मात्र त्यासाठी त्यांना चांगलाच संघर्ष करावा लागला. पावसामुळे सोमवारी पूर्ण झालेल्या अंतिम लढतीत फिलीप क्राजोनोव्हिकने युकी भांब्रीवर विजय मिळवला आणि सर्बियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ३-२ अशा विजयासह सर्बियाने डेव्हिस चषकाच्या जागतिक गटातले स्थान कायम राखले.
या पराभवामुळे भारताला पुढच्या वर्षी आशिया-ओशॅनिया गटातच खेळावे लागणार आहे. २०११ मध्ये भारताने जागतिक गटात प्रवेश मिळवला होता. त्या वेळी सर्बियानेच सलामीच्या लढतीत भारतावर मात केली होती.
एकेरीच्या दोन्ही लढती जिंकत सर्बियाने दमदार सुरुवात केली. दुहेरीच्या लढतीत लिएण्डर पेस आणि रोहन बोपण्णा यांनी मॅरेथॉन लढतीत थरारक विजय मिळवला. परतीच्या एकेरीच्या मॅरेथॉन लढतीत सोमदेव देववर्मनने दुसान लाजोव्हिकवर रोमहर्षक विजय साकारला. युकी भांब्री आणि फिलीप यांच्यातील लढतीत पहिला सेट फिलीपने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये ४-४ अशी बरोबरी असताना पावसाचे आगमन झाले. पावसाचा जोर वाढल्याने ही लढत राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी क्राजोनोव्हिकने युकीला ६-३, ६-४, ६-४ असे पराभूत करत सर्बियाला विजय मिळवून दिला.
सोमवारी प्रखर उन्हात झालेल्या मुकाबल्यात युकीच्या हातून मोठय़ा प्रमाणावर चुका झाल्या. क्राजोनोव्हिकला रोखण्याची संधीही युकीने वाया घालवली. दुसरा सेट जिंकत क्राजोनोव्हिकने विजयाचा पाया रचला. शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या वातावरणात हा सामना तिसऱ्या सेटमध्येच संपवणे योग्य ठरले या इराद्यासह क्राजोनोव्हिकने खेळ केला. युकीच्या तुलनेत त्याने सव्‍‌र्हिस आणि फटक्यांतील अचूकता जपली.
पाचवा आणि निर्णायक मुकाबला खेळण्याचे दडपण युकीच्या खेळात जाणवले. दोन सामने गमावल्यानंतर लढत जिंकण्याचा पराक्रम डेव्हिस चषकाच्या ११४ वर्षांच्या इतिहासात केवळ ५१ वेळा झाला आहे. भारताने २०१० मध्ये ब्राझीलविरुद्ध ही किमया केली होती. या पराक्रमाची पुनरावृत्ती करण्याची संधी पेस-बोपण्णा जोडीच्या अद्भुत विजयाने करून दिली होती. सोमदेवने चिवट खेळ करत संघर्षमय विजयासह भारताला विजयासमीप आणले. मात्र पावसाने व्यत्यय आणलेल्या लढतीत युकीला संघाला विजय मिळवून देता आला नाही.
‘माझ्या हातून खूप चुका झाल्या. दहा वर्षांच्या कारकिर्दीत अशा चुका मी केल्या नाहीत. निर्णायक लढत खेळण्याचा मला अनुभव नव्हता. पुनरागमन करण्याची मला संधी होती. पेस, बोपण्णा, सोमदेवने विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले मात्र मी अपेक्षेनुरूप कामगिरी करू शकलो नाही’, असे युकीने सांगितले.