खराब सुरुवातीतून स्वत:ला सावरत भारताच्या युकी भांब्रीने न्यूझीलंडच्या मायकेल व्हिनस याचा तीन सेटमध्ये पराभव करून ऑस्ट्रेलियातील ट्रॅराल्गोन येथे सुरू असलेल्या एटीपी चॅलेंजर स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आहे. आठव्या मानांकित युकीने दुसऱ्या फेरीच्या या सामन्यात १-६, ६-३, ७-६ (४) असा विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत २७७व्या स्थानावर असलेल्या युकीला आता जपानच्या तात्सूमा इटो याच्याशी लढत द्यावी लागेल. दरम्यान, सोमदेव देववर्मन आणि सनम सिंग यांनी मिचेल फ्रँक आणि मॅक स्टायस्लिंगर यांचा पराभव करून चालरेटव्हिले चॅलेंजर स्पर्धेच्या दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. सोमदेव-सनम यांनी हा सामना ६-२, ६-३ असा जिंकला.