प्रचंड दबावाखालीही आत्मविश्वासाने खेळ करत युकी भांबरीने डेव्हिस चषक टेनिस स्पध्रेच्या न्यूझीलंडविरुद्धच्या निर्णायक लढतीत विजय मिळवून भारताला वर्ल्ड ग्रुप प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवून दिले. गतवर्षी सर्बियाविरुद्ध अशाच निर्णायक लढतीत युकीने सामना गमावल्यानंतर भारताच्या प्ले ऑफमध्ये खेळण्याच्या आशा संपुष्टात आल्या होत्या. त्यानंतर युकीवर टीकेचा भडिमार झाला, परंतु यंदा युकीने अप्रतिम खेळ करून टीकाकारांचे तोंड बंद केले.
रोहन बोपन्ना आणि साकेत मायनेनी यांच्या पराभवामुळे भारत १-२ अशा पिछाडीवर पडला होता. त्यामुळे एकेरीच्या परतीच्या लढतीत विजय मिळवणे आवश्यक झाले होते. एकेरीच्या पहिल्या सामन्यात पराभूत झालेल्या सोमदेव देववर्मनने परतीच्या लढतीत विजय मिळवून २-२ अशी बरोबरी साधली. सोमदेवने जोस स्टॅथमचा ६-४, ६-४, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. त्यामुळे अखेरच्या आणि निर्णायक लढतीत युकीवर जबाबदारी आली. प्रचंड दबावात असलेल्या युकीने संयमाने आणि अप्रतिम खेळाचा नजराणा पेश केला. युकीने यजमानांच्या मायकेल व्हिनसचा ६-२, ६-२, ६-३ असा पराभव करून भारताच्या विजयावर ३-२ असे शिक्कामोर्तब केले.
या विजयानंतर वरिष्ठ खेळाडू सोमदेव आणि रोबन बोपन्ना यांनी युकीचे कौतुक केले. ‘‘युकीचा खेळ, हा आजच्या दिवसाचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. त्याने न्यूझीलंडच्या व्हिनसवर प्रचंड दबाव निर्माण केला. युकीच्या सव्‍‌र्हिसचे व्हिनसकडे उत्तरच नव्हते. त्याने व्हिनसला बचावात्मक खेळ करण्यास भाग पाडले आणि स्वत: आक्रमण करत राहिला. त्याने प्रतिस्पध्र्यावर खऱ्या अर्थाने वर्चस्व गाजवले,’’ अशी प्रतिक्रिया सोमदेवने दिली. तो म्हणाला, ‘‘आम्हा दोघांकडून अप्रतिम खेळ झाला. आमच्या विजयाचा मला गर्व आहे. दोघांनीही दबावाखाली सर्वोत्तम खेळ केल्याचा, आनंद आहे.’’
यापूर्वी युकीचा असा खेळ पाहिलाच नव्हता, असे मत बोपन्नाने ट्विटरवर व्यक्त केले. तो म्हणाला, ‘‘या मुलासाठी हा मोठा विजय आहे. डेव्हिस चषक स्पध्रेतील युकीचा हा सर्वोत्तम खेळ होता. त्याने प्रचंड मेहनत घेतली.’’

मी कठोर मेहनत घेतली होती. दीर्घ काळ चालणाऱ्या लढतीसाठी मी दिल्लीच्या उकडत्या तापमानात दोन आठवडे सराव केला आणि खेळात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. या मेहनतीचे चीज झाले, याचा आनंद वाटतोय. या विजयापेक्षा आणखी चांगली गोष्ट असूच शकत नाही.
युकी भांबरी