पाकिस्तानचा वरिष्ठ फलंदाज युनुस खानने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा बुधवारी निर्णय घेतला. इंग्लंडविरुद्ध येथे होणारा एकदिवसीय सामना आपला अखेरचा सामना असेल, असे त्याने सांगितले. युनुस म्हणाला, ‘‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंधरा वर्षे खेळत असल्यामुळे निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेणे सोपे नव्हते. मात्र नवीन खेळाडूंना संधी देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. एकदिवसीय व ट्वेन्टी२० प्रकारातून निवृत्त होण्याचा निर्णय स्वत:हून घेता आला, हे माझे भाग्यच आहे.’’

युनुसला ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत संधी मिळाली नव्हती. तरिही इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात त्याची निवड करून निवड समितीने आश्चर्याचा धक्का दिला होता. कराची येथे फेब्रुवारी २००० मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याद्वारे त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पदार्पण
केले.
३७ वर्षीय युनुसने आतापर्यंत २६५ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संघाचे प्रतिनिधित्व केले असून त्याच्या नावावर सात हजारहून अधिक धावा आहेत. त्यामध्ये सात शतके व ४८ अर्धशतकांचा समावेश आहे. मार्च २०१३ नंतर त्याला केवळ ११ एक दिवसीय सामन्यांमध्ये संधी देण्यात आली होती.
‘‘निवृत्त होण्याचा निर्णय मी माझ्या सहकाऱ्यांशी व कुटुंबीयांशी चर्चा करूनच घेतला आहे. निवृत्तीचा निर्णय नेहमीच क्लेशकारक असतो, मात्र प्रत्येक खेळाडूच्या कारकीर्दीत असा क्षण येतो. आजपर्यंतच्या कारकीर्दीबाबत मी खूप समाधानी आहे. संघाला विजय मिळवून देण्यात मी महत्त्वाचा वाटा उचलला आहे. आमच्या देशात नैपुण्याची कमतरता नाही. युवा खेळाडूंनी शिस्त व तंदुरुस्तीला प्राधान्य देत कारकीर्द यशस्वी करावी,’’ असा सल्ला त्याने दिला.