भारताचा ‘सिक्सर किंग’ युवराज सिंग याने सोमवारी आपल्या निवृत्तीची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला त्याने अलविदा म्हंटले. मात्र देशांतर्गत टी २० लीग स्पर्धांमध्ये तो खेळतच राहणार असल्याचे त्याने यावेळी स्पष्ट केले. निवृत्तीचा निर्णय घेताना युवराज अत्यंत भावुक झाल्याचे दिसून आले. निवृत्तीचा निर्णय घेणे हे माझ्यासाठी अत्यंत कठीण होते, पण मी माझ्या कुटुंबियांशी चर्चा करून तसेच इतर वरिष्ठ आजी-माजी क्रिकेट सहकारी यांच्याशी चर्चा करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला, असे युवराजने मुंबईतील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

सचिन तेंडुलकर ज्या प्रकारे शेवटचा सामना मुंबईच्या मैदानावर खेळला, त्याप्रमाणे तुला शेवटचा सामना स्वतःच्या आवडत्या मैदानावर खेळावासा वाटला नाही का? किंवा तू BCCI ला या बाबतची विनंती केली नाहीस का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना युवराज म्हणाला की मला अशा पद्धतीचे क्रिकेट आवडत नाही. मी कधीच कोणाकडे माझ्या निरोपाचा सामना खेळण्याचा हट्ट धरला नाही. मी यो-यो टेस्ट पास झालो नाही, तर मला निरोपाचा सामना खेळायला मिळेल आणि त्यानंतर मला निवृत्त व्हावे लागेल, असे मला सांगण्यात आले होते. पण मला त्या पद्धतीचा निरोप कधीही नको होता. त्यामुळे मी स्पष्टपणे सांगितले की जर मी यो-यो टेस्ट पास झालो नाही, तर मला कोणीही इतर लोकं सांगण्याआधी मी स्वतःहून घरी निघून जाईन आणि निवृत्ती स्वीकारेन.

युवराजचे वडील हे अतिशय शिस्तीचे आहेत. त्यांनीच युवराजला क्रिकेटमध्ये येण्यास प्रोत्साहन दिले. त्यामुळे युवराजच्या निवृत्तीबाबत त्यांचे मत काय? असा प्रश्नही त्याला विचारण्यात आला. याबाबतही युवराजने दिलखुलास उत्तर दिले. युवराज म्हणाला की मी माझ्या वडिलांच्या साठी क्रिकेटमध्ये आलो. ते स्वतः उत्तम क्रिकेटर होते. पण त्यांनाकिर्केट विश्वचषक उंचावता आला नाही. त्यामुळे त्यांनी ते स्वप्न माझ्यात पाहिले. सुदैवाने त्यांचे हे स्वप्न मी पूर्ण करू शकलो. २००७ चा टी २० विश्वचषक आणि २०११ चा एकदिवसीय विश्वचषक असे दोन विश्वचषक उंचावण्यात मी माझा मोलाचा वाटा उचलला असे मला वाटते, त्यामुळे माझ्या वडिलांना माझ्या या कारकिर्दीनंतरच्या निवृत्तीवर नक्कीच अभिमान वाटत आहे, असेही युवराजने सांगितले.