आपल्या नजाकतभऱ्या आणि आक्रमक फलंदाजीने अनेकांचे लक्ष वेधून घेणारा क्रिकेटपटू युवराज सिंग आज ३२व्या वर्षात पदार्पण करत आहे. भारतीय क्रिकेटला खऱ्या अर्थाने ग्लॅमर मिळवून देणारा खेळाडू म्हणून त्याचे नाव घ्यावे लागेल. २०११ सालचा विश्वचषक भारताला जिंकून देण्यात युवीच्या सातत्यपूर्ण फलंदाजीचा खूप मोठा वाटा होता. गेली अनेक वर्षे या डावखुऱ्या फलंदाजाने भारतीय संघाच्या मधल्या फळीची धुरा समर्थपणे सांभाळली. मात्र, विश्वचषकानंतर युवराज सिंगला झालेले कॅन्सरचे निदान अनेक क्रिकेटरसिकांच्या काळजाचा ठोका चुकवणारे ठरले. मैदानावर खंबीरपणे उभे राहून भारतीय संघाला वेळोवेळी सावरणाऱ्या युवीने वैयक्तिक जीवनातही कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाचा कणखरपणे सामना करून अनेकांपुढे नवा आदर्श निर्माण केला. यंदाच्या विश्वचषकासाठी संघात फिटनेसअभावी त्याची निवड होऊ शकली नसली, तरी युवीची मैदानावरील आणि वैयक्तिक जीवनातील ‘इनिंग’ यापुढेही अनेकांना प्रेरणा देत राहील.