देशभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. जवळपास दोन महिन्यांच्या लॉकडाउनमुळे सारेच कंटाळले आहेत, पण करोनाचा फैलाव रोखण्यासाठी घराबाहेर न पडणे तितकेच गरजेचे आहे. हळूहळू लॉकडाउनबाबतचे नियम शिथिल केले जात आहेत, पण अद्याप करोनाचा धोका टळला नसल्याने शक्य तितकी काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. अशा परिस्थितीमध्ये घरात बसून कंटाळलेले क्रिकेटपटू एकमेकांना घरातच चॅलेंज देत आहेत.

भारतीय माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला किप इट अप चॅलेंज दिलं होतं. बॅट उभी धरून बॅटेच्या कडेने (edge) चेंडू शक्य तितक्या वेळा टोलवत राहणे, असा हा चॅलेंज आहे. युवराजने स्वत: घराच्या टेरेसवर हा चॅलेंज पूर्ण करून मग पुढे सचिनला आव्हान दिलं होतं.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हे चॅलेंज सहज पूर्ण केलं. सचिनने तर हे चॅलेंज चक्क डोळ्यावर पट्टी बांधून पूर्ण केलं. सचिनने आपल्या इन्स्टाग्रामवर दोन व्हिडीओ पोस्ट केले. त्यात पहिल्या व्हिडीओमध्ये सचिनने हे चॅलेंज पूर्ण केलं. तर दुसऱ्या व्हि़डीओमध्ये सचिनने डोळ्यावर बांधलेल्या काळ्या पट्टीचं रहस्य युवीला सांगितलं.

त्यानंतर आता युवराजने पुन्हा एकदा सचिनला आव्हान दिलं आहे. मैदानाच्याऐवजी घराच्या स्वयंपाकघरात शतक ठोकून दाखव असं आव्हान सचिनला युवराजने दिलं आहे. स्वयंपाकघरात पोळी लाटण्यासाठी वापरण्यात येणारं लाटणं आणि चेंडू याच्या सहाय्याने १०० वेळा चेंडू किप इट अप चॅलेंजप्रमाणे उडवून दाखव, असं हे चॅलेंज आहे.

आता शतकवीर सचिन हे अनोखं चॅलेंज पूर्ण करतो का? आणि केलं तर कशाप्रकारे करतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.