ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ट्वेन्टी-२० मालिकेसाठी अनुभवी क्रिकेटपटू युवराज सिंगची निवड झाली. मात्र संघातून डच्चू मिळण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या २०१४च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीतील निराशाजनक कामगिरीच्या कटू आठवणी आजही त्रास देतात, असे उद्गार युवराज सिंगने काढले. श्रीलंकेविरुद्धच्या त्या सामन्यात युवराजला २१ चेंडूंत केवळ ११ धावा करता आल्या होत्या. या संथ खेळीमुळे युवराज टीकेचे लक्ष्य ठरला होता. याचीच परिणती म्हणून युवराजला भारतीय संघातून वगळण्यात आले.
पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारताच्या ट्वेन्टी-२० संघात युवराजला स्थान देण्यात आले आहे. या संधीचे सोने करून आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा छाप पाडणार असल्याचा विश्वास युवराजने व्यक्त केला. तो म्हणाला, ‘‘२०१४च्या अंतिम लढतीत मला चांगली कामगिरी करता आली नाही. ती निराशाजनक कामगिरी अजूनही सतावते आहे. गेले एक-दीड वर्ष शारीरिक तंदुरुस्ती, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी यावर प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामुळे आशा करतो की, पुढील हंगामात त्याचा निकाल पाहायला मिळेल.’’
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दमदार कामगिरी करून ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेत भारतीय संघात स्थान मिळवण्याचे ध्येय युवराजने डोळ्यांसमोर ठेवले आहे. ‘‘२००७मध्ये आम्ही ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला आणि आम्ही प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला. त्यामुळे २०११च्या एकदिवसीय विश्वचषक स्पध्रेनंतर पुन्हा ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला असता तर देशाने आमच्यावर कौतुकाचा वर्षांव केला असता,’’ असे तो म्हणाला.
२००७ आणि २०११च्या विश्वचषक विजयाचा शिल्पकार असलेला युवराज म्हणाला, ‘‘खेळाचा पुरेपूर आनंद मिळेपर्यंत खेळावेसे वाटते. मग ते स्थानिक क्रिकेट असो की आंतरराष्ट्रीय. स्थानिक क्रिकेटमध्ये स्वत:ला प्रेरित करणे कठीण आहे; परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करण्याचा तो एकमेव मार्ग आहे.’’
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दीर्घकाळ कामगिरीत चढ-उतार येतात; परंतु त्यातही ध्येयावर लक्ष केंद्रित करणे आणि कठोर परिश्रम करणे आवश्यक असल्याचे युवराजला वाटते. ‘‘१३-१४ वष्रे आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण खेळ करणे अवघड आहे. विशेषकरून माझ्या तब्येतीचा विचार करता हे कठीणच आहे. आजारपणातून बरा झाल्यानंतर मी गेली दोन-तीन वष्रे मेहनत घेत आहे. त्यातही सातत्य नव्हते, परंतु यंदाच्या स्थानिक क्रिकेटच्या हंगामात मी दमदार फलंदाजी केली. एकदिवसीय सामन्यात तर बॅट चांगलीच बहरली आणि त्याचा मला आनंद वाटत आहे. त्यामुळे संधी मिळाल्यास चांगली कामगिरी करेन असे मला मनापासून वाटते,’’ असे युवराजने सांगितले.