भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि विश्वचषक जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा युवराज सिंग गेल्या अनेक काळापासून भारतीय संघापासून दूर आहे. भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवण्यासाठी युवराज सतत प्रयत्न करत आहे. एकेकाळी गोलंदाजांवर तुटून पडणाऱ्या युवराजला फॉर्म सापडत नसल्याने आयपीएल लिलावातही त्याला विकत घेण्यास कोणी रस दाखवत नव्हतं. अखेर मुंबई इंडियन्सने मूळ किंमतीला विकत घेत युवराजला संघात स्थान दिलं. नुकतंच युवराज सिंगने जबरदस्त खेळी केली आहे ज्यामुळे त्याचं मनोधैर्य वाढलं असेल आणि मुंबई इंडियन्सच्याही अपेक्षा वाढल्या असतील.

मुंबईत खेळल्या जात असलेल्या डी वाय पाटील टी-20 स्पर्धेत युवराज सिंगने एअर इंडियाकडून खेळताना स्फोटक फलंदाजी करत 57 चेंडूत 80 धावा ठोकल्या. यावेळी युवराज सिंगला पुन्हा एकदा फॉर्म सापडलेला पहायला मिळाला. युवराज सिंगने केलेल्या जबरदस्त खेळीच्या आधारे एअर इंडियाने मुंबई कस्टमविरोधात 20 ओव्हर्समध्ये सात गडी गमावत 169 धावसंख्या उभी केली. मात्र एअर इंडियाने हा सामना गमावला.

सामन्यात पराभव झाला असला तरी युवराज सिंगने केलेल्या खेळीमुळे चाहत्यांना आनंद झाला आहे. युवराज सिंगला 21 फेब्रुवारीला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत खेळायचं असून त्यानंतर आयपीएल खेळायचं आहे. यामुळे त्याची खेळी महत्त्वाची आहे.

अनेक दिवसांनी युवराज सिंगच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडताना पहायला मिळालेला आहे. गतवर्षी आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळताना युवराजने आठ सामन्यांत फक्त 65 धावा केल्या होत्या. यावेळी मुंबई इंडियन्सने एक कोटींच्या मूळ किंमतीला युवराज सिंगला विकत घेतलं आहे.