सध्या बेफाम फॉर्मात असलेला अनुभवी फलंदाज युवराज सिंगने भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यांसाठी आणि एकमेव ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा सोमवारी करण्यात आली. यात निवड समितीने वेगवान गोलंदाज उमेश यादवला डच्चू दिला आहे.
या वर्षी जानेवारी महिन्यात धर्मशाळा येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात युवराज अखेरचा खेळला होता. परंतु वेस्ट इंडिज ‘अ’ संघाविरुद्धची दमदार कामगिरी आणि एनकेपी साळवे चॅलेंजर क्रिकेट स्पध्रेतील धडाकेबाज फलंदाजीच्या बळावर युवराजने भारतीय संघात पुनरागमन केले आहे.
धडाकेबाज फलंदाजी आणि उपयुक्त डावखुरी फिरकी गोलंदाजी या बळावर युवराज भारतीय संघात अष्टपैलू खेळाडूची उणीव भरून काढेल. याचप्रमाणे मधल्या षटकांमध्ये तो गोलंदाजीचा महत्त्वाचा भार सांभाळेल. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेत एकमेव अर्धशतक साकारणाऱ्या दिनेश कार्तिकची जागा युवराजने घेतली. संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवड समितीने जाहीर केलेल्या संघात सलामीवीर मुरली विजय स्थान मिळवू शकला नाही. कारण मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठीची उपयुक्तता सिद्ध करण्यात तो अयशस्वी ठरला.
वेगवान गोलंदाज उमेश यादव खराब कामगिरीमुळे संघातील स्थान टिकवू शकला नाही. चॅलेंजर क्रिकेट स्पध्रेत यादवने इंडिया रेडकडून खेळताना अनुक्रमे १० षटकांत ६७ धावा व ९ षटकांत ८५ धावा दिल्या होत्या.
बंगालचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी, कर्नाटकचा वेगवान गोलंदाज रंगनाथ विनय कुमार आणि सौराष्ट्रचा उदयोन्मुख डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट हा झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतील वेगवान मारा कायम ठेवण्यात आला आहे. हरयाणाचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माला वगळण्यात आले आहे. तथापि, झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेप्रसंगी विश्रांती देण्यात आलेले भुवनेश्वर कुमार आणि अनुभवी इशांत शर्मा या महत्त्वाच्या मालिकेसाठी संघात परतले आहेत. रविवारी झालेल्या चॅलेंजरच्या अंतिम सामन्यात इंडिया ब्ल्यूच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या भुवनेश्वरने चार बळी घेण्याची कामगिरी बजावली होती.
जम्मू आणि काश्मीरचा युवा अष्टपैलू खेळाडू परवेझ रसूलने अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनकरिता त्याचे स्थान रिक्त करून दिले आहे. तथापि, झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत १८ बळी घेण्याची किमया साधणाऱ्या अमित मिश्राने आपले स्थान राखण्यात यश मिळवले आहे.
राखीव फलंदाजाच्या स्थानासाठी अंबाती रायुडू व अजिंक्य रहाणे यांच्यात कडवी लढत होती. परंतु अखेर बडोद्याच्या रायुडूने मुंबईच्या रहाणेवर मात केली. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुभवी फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांच्या नावांची निवड समितीच्या बैठकीत चर्चाही झाली नाही.

भारतीय संघ :
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंग, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, रंगनाथ विनय कुमार, मोहम्मद शामी, जयदेव उनाडकट, अमित मिश्रा, अंबाती रायुडू.

युवराजची कामगिरी पथ्यावर
युवराजने ‘अ’ दर्जाच्या पाच क्रिकेट सामन्यांमध्ये ६७.४०च्या सरासरीने ३३७ धावा केल्या. वेस्ट इंडिज ‘अ’ संघाविरुद्ध त्याने १२३ धावांची दमदार खेळी साकारली होती. याचप्रमाणे बंगळुरूला विंडीज ‘अ’ विरुद्ध झालेल्या ट्वेन्टी-२० सामन्यात युवराजने वादळी ५२ धावा केल्या होत्या.