भारताच्या 2011 विश्वचषकाचा नायक, सिक्सर किंग युवराज सिंग आज(दि.10) आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम देण्याची शक्यता आहे. युवराजने दक्षिण मुंबईच्या एका हॉटेलमध्ये आज एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. यामुळे तो निवृत्तीची घोषणा करणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

२०१७ मध्ये इंग्लंड येथे झालेल्या चॅम्पियन्स चषकानंतर युवराजला भारतीय संघात क्वचितच स्थान मिळाले आहे. त्याशिवाय आगामी विश्वचषकासाठीही त्याला संघातून वगळण्यात आले आहे. तसंच यंदा आयपीएलमध्ये मुंबई इंडियंस संघाकडून खेळतानाही युवराजला फारशी संधी मिळाली नाही, आणि जेव्हा मिळाली त्यात त्याला आफली पाहिजे तशी छाप पाडता आलेली नाही.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘युवराज आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा विचार करत आहे. युवराज सिंगला जीटी-२० (कॅनडा), आयर्लंडमध्ये युरो टी-२० स्लॅम आणि हॉलंडमध्ये खेळण्याच्या ऑफर आहेत.

यापूर्वी ‘बीसीसीआय’च्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवरून ‘‘सध्या युवराज आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करण्याचा विचार करत आहे. मात्र त्यापूर्वी ‘बीसीसीआय’कडून पुढील कारकीर्दीविषयी हिरवा कंदील मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. कॅनडाच्या जीटी ट्वेन्टी-२०, आर्यलडच्या युरो स्लॅम यांसारख्या स्पर्धात तो खेळण्यासाठी उत्सुक आहे,’’ असे सांगितले होते.  त्यामुळे जर युवराजने आज निवृत्तीची घोषणा केली तर आश्चर्य वाटायला नको. ३७ वर्षीय युवराजने ४० कसोटी, ३०४ एकदिवसीय, ५८ ट्वेन्टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले असून २००७च्या ट्वेन्टी-२० आणि २०११च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताला विजेतेपद मिळवून देण्यात युवराजचा मोलाचा वाटा होता.