मुंबई आणि दिल्ली यांच्यातील वानखेडे मैदानावरील सामन्यात दिल्लीने विजयी सलामी दिली. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला दिल्लीने रचलेला २१३ धावांचा डोंगर सर करता आला नाही. सामन्यामध्ये पराभव झाला असला तरी मुंबईच्या दृष्टीने युवराज सिंगची खेळी जमेची बाजू ठरली. युवराजने एकदा लढाऊ वृत्ती दाखवत धमाकेदार अर्धशतकी खेळी केली. समान्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना युवराजने निवृत्तीबद्दल महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. आपण इतक्यात क्रिकेटमधून निवृत्ती घेणार नसल्याचे संकेत युवराजने या पत्रकार परिषदेमध्ये दिले आहेत.

जून २०१७ मध्ये भारतीय संघाकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या युवराजच्या भविष्यावर मागील बऱ्याच काळापासून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. घरगुती स्पर्धांमध्येही युवराजला चमकदार कामगिरी करता आली नाही. त्याचबरोबर वरचेवर तब्बेतीच्या कारणामुळे त्याला मैदानाबाहेरच रहावे लागले. आयपीएलच्या लिलावातही अगदी शेवटच्या क्षणी मुंबई इंडियन्सने युवराजसाठी बोली लावून त्याला संघात घेतले. अनेकांच्या मते युवराजला कमबॅक करण्याची ही शेवटची संधी असून आयपीएलच्या या मौसमात युवराजची कामगिरी त्याचे भविष्य ठरवेल असं बोललं जात आहे. तरी युवराजने मात्र इतक्यात निवृत्तीचा विचार मनात नसून याबद्दल मी सचिन तेंडुलकरशीही चर्चा केली असल्याचे पत्रकारांना सांगितले.

नक्की वाचा >> IPL 2019 : Yuvi is Back! युवराजच्या लढाऊ खेळीचे चाहत्यांकडून कौतुक

‘जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी स्वत:हून निवृत्ती जाहीर करेन. मी याबद्दल सचिनशीही (तेंडुलकर) चर्चा केली आहे. त्याच्या कारकिर्दीतही वयाच्या ३८-३९ व्या वर्षी असाच काळ आला होता. त्याच्याबरोबर बोललण्याने अनेक गोष्टींची उत्तरे मला मिळाली. मागील दोन वर्षे माझ्यासाठी बरीच चढ उतार असणारी ठरली. मला क्रिकेट खेळायला आवडायचं म्हणून मी क्रिकेट खेळू लागलो. तेव्हा मी भारतासाठी खेळत नव्हतो. मी १४ वर्षाखालील संघात आणि १६ वर्षाखालील संघातून खेळायला सुरूवात केली. त्यानंतर मला भारतासाठी खेळाण्याची संधी मिळाली. खेळातून जो पर्यंत मला आनंद मिळत आहे, तोपर्यंत मी खेळतच राहिन,’ असं युवराजने सांगितले.

एकीकडे मुंबईचे फलंदाज तंबूत परतत असताना युवराज मैदानात धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न करत होता. आपल्या खेळाबद्दल बोलताना युवराज म्हणतो, ‘मी आज स्वत:ला सेट होण्यासाठी वेळ दिला. एकीकडे गडी बाद होत होते. त्यामुळे मी जर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला असता तर आम्हाला आव्हानाच्या जास्त जवळ जाता आले नसते. हाच विचार करुन मी शेवटपर्यंत टिकून राहण्याचा प्रयत्न केला. ज्याप्रमाणे मी फटकेबाजी केली त्यावर मी खूष आहे,’ असं युवराज म्हणाला.