भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या यो-यो टेस्टमध्ये युवराज सिंग अखेर पास झाला आहे. एका मुलाखतीमध्ये युवराजने फिटनेसच्या अग्निपरीक्षेत यश मिळाल्याचे सांगितले. यावेळी तो म्हणाला की, भारतीय संघात स्थान मिळवण्याची आशा अद्यापही कायम आहे. फिटनेससाठी अनिवार्य करण्यात आलेल्या यो-यो टेस्टमध्ये तीनवेळा अपयश आल्याची माहिती देखील त्याने दिली. एवढेच नाही तर २०१९ च्या विश्वचषकात खेळण्यासाठी आशावादी असल्याचे तो म्हणाला.

युवराज सिंगने यो-यो टेस्टचा अडथळा पार केला असला तरी रणजीच्या मैदानात तो बीसीसीआय निवड समितीचे लक्ष वेधण्यास अपयशी ठरला आहे. परिणामी, आगामी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. यंदाच्या सत्रात युवराज सिंग पंजाबकडून दोन रणजी सामने खेळला होता. या सामन्यात त्याला फारसे यश आले नाही. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत मेहनत घेऊन युवीने यो-यो टेस्टमध्ये पात्रता सिद्ध केली. मात्र, भारतीय संघात त्याला कोणत्या कामगिरीच्या जोरावर मैदानात घ्यावे, हा मोठा प्रश्न आहे.

यापूर्वी बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी मैदानातील कामगिरीनंतरच युवराजचा विचार होऊ शकतो, असे स्पष्ट केले होते. दक्षिण आफ्रिका दौरा आणि श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली. त्यावेळी युवराजच्या पुनरागमनाबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी ते म्हणाले की, युवराजने यो-यो टेस्ट पात्रता सिद्ध केली ही चांगली गोष्ट आहे. पण, अनेक दिवसांपासून तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. मैदानातील कामगिरीवरच त्याच्या निवडीबद्दल विचार केला जाईल.

प्रसाद यांच्या या वक्तव्यावरुन दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील एकदिवसीय सामन्यासाठी देखील युवराजला स्थान मिळणे मुश्किल वाटते. सध्या सुरु असणाऱ्या रणजी सामन्यानंतर विजय हजारे करंडक स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन युवराजला मैदानातील कामगिरी दाखवून देण्याची संधी आहे. १६ फेब्रुवारी ते ८ मार्च २०१८ दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊन युवराज संघात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करेल  का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.