श्रीलंका दौऱ्यावरील कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. भारतीय संघ जेव्हा एतिहासिक विजयाच्या उंबरठ्यार होता, त्याचवेळी एकदिवसीय संघाची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर युवीच्या चाहत्यांना धक्का बसला. कसोटी संघातून बाहेर असणाऱ्या युवराजला एकदिवसीय आणि टि-२० मध्ये संधी मिळेल, अशी आशा त्याच्या क्रिकेट चाहत्यांना होती. मात्र युवराजला संघात स्थान मिळाले नाही. युवराज सिंगला संघात स्थान मिळाले नसल्यामुळे युवीच्या संघातील स्थानावर पुन्हा तर्क वितर्क रंगण्यास सुरुवात झाली.

मात्र, निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी युवराजच्या चाहत्यांना दिलासा देणारी प्रतिक्रिया दिली आहे. युवराज सिंगला संघातून डच्चू दिला नसून त्याला विश्रांती दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रसाद म्हणाले की, भारतीय क्रिकेट निवड समिती सध्या नव्या रणनितीसह मैदानात उतरत आहे. या रणनितीमध्ये पुढील चार ते पाच महिन्यांत नवीन खेळाडूंना संधी देऊन त्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर २०१९ च्या आगामी विश्वचषकासाठी कोणता खेळाडू संघात असेल, यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. युवीच्या विश्वचषकात खेळण्याची संधी अद्याप कायम असल्याचेही त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितले. तसेच कोणत्याही खेळाडूच्या तंदुरुस्तीबाबत तडजोड केली जाणार नाही, असेही प्रसाद यांनी स्पष्ट केले.

इंग्लंडमध्ये रंगलेली चॅम्पियन्स करंडक स्पर्धा आणि वेस्ट इंडिज दौऱ्यावरील सामन्यात युवराज सिंगलाला संधी देण्यात आली होती. यात युवराज अपयशी ठरला. श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाची निवड होण्यापूर्वी सुरेश रैना आणि युवराज सिंग बंगळुरुमध्ये घाम गाळताना दिसले होते. त्यांच्या या मेहनतीमुळे निवड समिती त्यांनी संधी देईल, असे वाटले होते. पण नवोदितांना संधी देण्यासाठी अखेर निवड समितीने युवराजला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला.