एकोणीस वर्षांच्या झंझावती व लढवय्या कारकिर्दीनंतर युवराज सिंगनं निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र, ही जाहीर करताना कारकिर्दीच्या शेवटी आयपीएलमध्ये खेळायची संधी मिळाली असती तर चांगला परफॉर्मन्स दाखवून समाधानी होऊन निवृत्त झालो असतो अशी खंत त्यानं व्यक्त केली.

आयुष्यात प्रत्येकाला सगळं काही मिळत नाही, आपल्याला तडजोड करावी लागते असं सांगत आता बास झालं असं आपण ठरवल्याचं त्यानं सांगितलं. 2000 पासून आपण क्रिकेट खेळतोय, अनेकवेळा हरलो, परत उभा राहिलो पण आता असं वाटत होतं गेले काही दिवस की बास झालं आणि मग मी वडिलांशी बोललो आणि हा निर्णय घेतला असं तो म्हणाला.

इतकी कारकिर्द देशासाठी खेळल्यानंतर चांगला शेवट व्हावा असं वाटत होतं असं भावूक झालेला युवराज म्हणाला. आयपीएलमध्ये ही संधी मिळेल असं वाटलं होतं. युवराज आयपीएलच्या सीझनमध्ये मुंबईकडून खेळला आणि एकूण 16 सामन्यांमध्ये त्याला चार सामन्यांमध्ये संधी मिळाली परंतु त्यात त्याला फारशी चमक दाखवता आली नव्हती.

त्यामुळे खरा लढवय्या असलेल्या युवराजनं ज्यावेळी सांगितलं की शेवटी संधी मिळाली असती तर समाधानी होऊन निवृत्त झालो असतो त्यावेळी तो भावूक झाला होता. आत्तापर्यंतच्या करीअरमध्ये वर्ल्ड कप जिंकणं हा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण होता असं त्यानं सांगितलं. मात्र वडिलांनी या निर्णयाचं स्वागत केलं. आपल्या कारकिर्दीवर वडील खूप खुश होते असं त्यानं सांगितलं. गेली दोन वर्षे आपण निवृत्तीचा विचार करत होतो व आई व पत्नीशी चर्चा करत होतो असं तो म्हणाला.