आक्रमक डावखुरा फलंदाज ऋषभ पंतला भारताच्या विश्वचषक संघात स्थान मिळाले नसले तरी युवराज सिंगला त्याच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. सिक्सर किंग युवराजने आज १८ वर्षाच्या यशस्वी कारकीर्दीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यावेळी युवराजला तुला कोणत्या खेळाडूमध्ये तुझी छाप दिसते? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला.

त्यावर युवराजने लगेच ऋषभ पंतचे नाव घेतले. ऋषभ पंतने कसोटीमध्ये दोन शतके ठोकली आहेत. तो प्रतिभावंत फलंदाज असून त्याच्यामध्ये माझ्यापेक्षाही जास्त क्षमता आहे अशा शब्दात त्याने पंतचे कौतुक केले. भारतीय संघाची २०१९ विश्वचषक स्पर्धेसाठी घोषणा झाली. त्यावेळी ऋषभ पंतला वगळण्याची भरपूर चर्चा झाली होती.

त्याच्याजागी दिनेश कार्तिकची संघात निवड करण्यात आली होती. ऋषभ पंत आक्रमक फलंदाज असल्यामुळे त्याला संधी दिली पाहिजे होती असे अनेकांचे मत होते. पण निवड समितीने अनुभवाला प्राधान्य देत ऋषभ पंत ऐवजी दिनेश कार्तिकला निवडले. आज युवराजने निवृत्तीच्यावेळी ऋषभ पंतकडून भरपूर अपेक्षा असल्याचे सांगितले.