टी-२० विश्वचषक स्पर्धेत ६ चेंडूंवर ६ षटकार लगावणारा युवराज सिंग याने सोमवारी आपल्या निवृत्तीची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला त्याने अलविदा म्हंटले. मात्र देशांतर्गत टी २० लीग स्पर्धांमध्ये तो खेळतच राहणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. निवृत्तीचा निर्णय घेताना युवराज अत्यंत भावुक झाल्याचे दिसून आले. निवृत्तीचा निर्णय घेणे हे माझ्यासाठी अत्यंत कठीण होते, पण मी माझ्या कुटुंबियांशी चर्चा करून तसेच इतर वरिष्ठ आजी-माजी क्रिकेट सहकारी यांच्याशी चर्चा करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला, असे युवराजने मुंबईतील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

यावर सर्व स्तरातून प्रतिक्रिया आल्या. युवराजने लॉर्ड्सवर नॅटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्यात केलेली खेळी लोकांच्या अजूनही लक्षात आहे. पण त्याला ‘सिक्सर किंग’ अशी उपाधी मिळण्यासाठी त्याने केलेली टी २० विश्वचषक स्पर्धेतील खेळी अजूनही त्याच्या सर्वोत्तम खेळींपैकी एक आहे. पहिल्यावहिल्या टी २० विश्वचषक स्पर्धेत युवराजने हा कारनामा केला होता. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात युवराज मैदानावर आला, तेव्हा अँड्र्यू फ्लिंटॉफ याने त्याला डिवचले, त्यानंतर पुढच्याच षटकात युवराजने स्टुअर्ट ब्रॉड या गोलंदाजाच्या षटकात ‘त्या’ डिवचण्याचा हिशेब चुकता केला आणि ६ चेंडूंवर ६ षटकार लगावले. ‘त्या’ स्टुअर्ट ब्रॉडनेही युवराजला खास ट्विट करून शुभेच्छा दिल्या.

View this post on Instagram

Enjoy retirement Legend @yuvisofficial

A post shared by Stuart Broad (@stuartbroad8) on

युवराजने त्या सामन्यात १२ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. ती खेळी त्यावेळी विक्रमी ठरली होती. १२ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक करण्याचा सनथ जयसूर्या याचा टी २० तील विक्रम होता, त्या विक्रमाशी युवराजने बरोबरी केली होती. त्या सामान्यामुळे भारताला एक विजयी सूर गवसला होता आणि भारताने तो विश्वचषक आपल्या नावे केला होता.