आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या युवराज सिंहने, जगभरातील टी-२० लिग स्पर्धेत खेळण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती बीसीसीआयला केली आहे. “युवराजने परवानगीचं पत्र बीसीसीआयला लिहीलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने निवृत्ती स्विकारल्यामुळे आता त्याला परवानगी मिळण्यास काहीच हरकत नाहीये.” बीसीसीआयमधील एका अधिकाऱ्याने पीटीआयला माहिती दिली.

भारतीय संघाकडून खेळणाऱ्या खेळाडूंना कोणत्याही बाहेरील देशांच्या टी-२० लिगमध्ये खेळण्यास परवानगी नाकारली आहे. याआधी माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग, झहीर खान यांना युएईमध्ये पार पडलेल्या टी-१० लिग स्पर्धेत खेळण्याची परवानगी देण्यात आली होती. गेल्या महिन्यात इरफान पठाणने कॅरेबियन प्रिमीअर लिग स्पर्धेच्या लिलावात आपलं नाव दिलं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इरफान सध्या खेळत नसला तरीही तो प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये खेळतो आहे. त्यामुळे बीसीसीआयची परवानगी न घेता लिलावात आपलं नाव दिल्यामुळे इरफान पठाणला बीसीसीआयने समज देऊन नाव मागे घ्यायला लावलं होतं.

बीसीसीआयने याआधी इरफानचा भाऊ युसूफ पठाणलाही हाँगकाँग टी-२० लिगमध्ये खेळण्यासाठी परवानगी नाकारली होती. निवृत्तीदरम्यान युवराज सिंहने टी-२० लिग स्पर्धांमध्ये खेळण्याचा मानस बोलून दाखवला होता. त्यामुळे बीसीसीआय आता युवराजला कधी परवानगी देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.