भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग करोना पीडितांना सतत मदत करताना दिसत आहे. अलीकडेच युवराजने ‘यू वी कॅन’ या फाउंडेशनच्या मदतीने भारतात करोना रूग्णांसाठी विविध रूग्णालयात एक हजार बेड देण्याची घोषणा केली होती. या मोहिमेतून मदतीचा एक हिस्सा हिमाचल प्रदेशमधील थियोग आणि रोहरू या दोन शहरांमध्ये पाठविला जात असल्याची माहिती युवराजने ट्विटद्वारे दिली आहे.

”कोविडच्या कठीण परिस्थितीत बेड आणि वैद्यकीय उपकरणे असलेले ट्रक्स दिल्लीहून हिमाचल प्रदेशातील थिओग आणि रोहरू येथे पाठवण्यात आले. काल संध्याकाळी हा ट्रक तिथे पोहोचला”, असे युवराजने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले. युवराजने केलेल्या मदतीबद्दल त्याच्या चाहत्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

हेही वाचा – ‘‘माझ्या नवऱ्याला असे कृत्य करण्यास भाग पाडले गेले, यामागे षडयंत्र आहे”

 

ऑक्सिजन, सुसज्ज बेड, व्हेंटिलेटरद्वारे रुग्णालयांची क्षमता वाढवणे हे आमचे लक्ष्य असल्याचे ‘यू वी कॅन’ फाऊंडेशनने सांगितले होते. भारतात करोना व्हायरसची दुसरी लाट आता ओसरत चालली आहे, पण या व्हायरसचा धोका पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे ऑक्सिजन पुरवण्यापासून रुग्णालयांपर्यंत बेड पोहोचवण्यापर्यंतच्या कामात सरकार गुंतले आहे.

हेही वाचा – कुस्तीपटू विनेश फोगटची सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक!

युवराजव्यतिरिक्त भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्यांची पत्नी अनुष्का शर्मा यांनीही त्यांच्या प्रयत्नातून करोनारुग्णांच्या मदतीसाठी ११ कोटी रुपये जमा केले होते. पॅट कमिन्स, ब्रेट ली, सचिन तेंडुलकर या खेळाडूंनीही करोना रुग्णांना मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात देणगी दिली आहे.