अष्टपैलू युवराज सिंह परदेशी टी २० क्रिकेट लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय खेळाडू असणार आहे. त्याला गुरूवारी कॅनडा टी २० लीगमध्ये टोरंटो नॅशनल्स संघाने विदेशी खेळाडू म्हणून करारबद्ध केले आहे. न्यूझीलंडचा मॅक्यूलम आणि विंडीजचा कायरन पोलार्डही टोरंटो नॅशनल्स संघाचे सदस्य असणार आहेत.

कॅनडामधील ही लीग स्पर्धा २५ जूलै रोजी सुरू होणार आहे. यामध्ये पाच संघाचा सहभाग आहे. ११ ऑगस्ट रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणाऱ्या युवराजने विदेशी टी २० क्रिकेट लीगमघ्ये खेळण्याच्या परवानगीचं पत्र बीसीसीआयला लिहीलं आहे. निवृत्ती स्वीकारल्यामुळे त्याला परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

बीसीसीआय भारतीय संघाकडून किंवा स्थानिक क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना कोणत्याही बाहेरील देशांच्या टी-२० लिगमध्ये खेळण्यास परवानगी देत नाही. युवराजच्या निवृत्ती जाहीर करण्यामागील हेही एक कारण असू शकते. याआधी माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग, झहीर खान यांनी युएईमध्ये पार पडलेल्या टी-१० लिगमध्ये आपला जलवा दाखवला होता.

गेल्या महिन्यात इरफान पठाणने कॅरेबियन प्रिमीअर लिग स्पर्धेच्या लिलावात आपलं नाव दिलं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इरफान सध्या खेळत नसला तरीही तो प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये खेळतो आहे. त्यामुळे बीसीसीआयची परवानगी न घेता लिलावात आपलं नाव दिल्यामुळे इरफान पठाणला बीसीसीआयने समज देऊन नाव मागे घ्यायला लावलं होतं.

बीसीसीआयने याआधी इरफानचा भाऊ युसूफ पठाणलाही हाँगकाँग टी-२० लिगमध्ये खेळण्यासाठी परवानगी नाकारली होती. निवृत्तीदरम्यान युवराज सिंहने टी-२० लिग स्पर्धांमध्ये खेळण्याचा मानस बोलून दाखवला होता.