गेले काही दिवस दुखापतींमुळे भारतीय क्रिकेट संघाबाहेर असलेल्या युवराज सिंहच्या अडचणीत वाढ होताना दिसते आहे. यंदा युवराज आपल्या मैदानातील कामगिरीऐवजी दुसऱ्याच कारणासाठी चांगलाच अडचणीत आलाय. युवराज सिंहचा भाऊ झोरावर सिंह याची पत्नी आकांक्षा शर्माने युवराज सिंह आणि त्याच्या परिवाराविरुद्ध घरगुती हिंसाचार कायद्याखाली तक्रार दाखल केली आहे. आकांक्षा शर्माने याआधी कलर्स टीव्हीवरील बिग बॉस या रिअॅलीटी शोमध्ये भाग घेतला होता.

आपला पती झोरावर, त्याची आई शबनम आणि क्रिकेटपटू युवराज सिंह यांच्याविरोधात आकांक्षाने तक्रार दाखल केल्याचं आकांक्षा शर्माच्या वकील स्वाती मलिक यांनी सांगितले. या प्रकरणी स्वाती मलिक म्हणाल्या, प्रत्येक वेळी घरगुती हिंसेचा अर्थ मारझोड होणं असा होत नाही. एखाद्या स्त्रीला लग्नानंतर मानसिक त्रास देणं, तिची आर्थिक कोंडी करणं हे प्रकारही घरगुती हिंसाचाराच्या कक्षेत येतात. दुर्दैवाने युवराजही या प्रकारात सहभागी असल्याचं आकांक्षाच्या वकिलांचं म्हणणं आहे.

काही दिवसांपूर्वी युवराज सिंहची आई शबनम यांनी आकांक्षाला लग्नानंतर मुल होण्याबद्दल विचारणा केली. मात्र आकांक्षाने सध्या मुलं होऊ देण्याबद्दल आपण कोणताही विचार केला नसल्याचं समजताच, शबनम यांनी आकांक्षावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. यात युवराज सिंहनेही आपल्या आईची साथ देत, आकांक्षावर दबाव टाकल्याचं तिच्या वकिलांनी म्हटलं आहे.

युवराज आणि त्याच्या परिवारावर आकांक्षाने आरोप करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी बिग बॉस या शोमध्ये सहभागी झालेली असताना आकांक्षाने युवराज सिंहवर गंभीर आरोप केले होते. झोरावर आणि माझ्या विभक्त होण्याला युवराज आणि त्याची आई जबाबदार असल्याचा आरोप आकांक्षाने केला होता. यानंतर युवराजच्या परिवाराशी कोणत्याही प्रकारे संबंध न ठेवण्याचं ठरवत आकांक्षाने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. या प्रकरणात २१ ऑक्टोबरला सुनावणी होणं अपेक्षित आहे. यावर युवराज सिंह आणि त्याच्या परिवाराकडून अजून कोणतेही स्पष्टीकरण आलेलं नाही. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणी नेमक्या काय घडामोडी घडताहेत हे पाहावं लागणार आहे.