राजस्थान रॉयल्सविरुद्ध घणाघाती खेळी करणाऱ्या युवराज सिंगने मंगळवारी पुन्हा एकदा आपल्या तडाखेबंद फलंदाजीचा नजराणा पेश केला. तब्बल नऊ षटकारांची आतषबाजी करत युवराज सिंगने बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील घरच्या चाहत्यांना खूश केले. अखेरच्या चार षटकांत युवराजने साकारलेल्या तुफानी खेळीमुळे बंगळुरूने २० षटकांत ४ बाद १८६ धावांचा डोंगर उभारला.
पावसामुळे सव्वा तास उशिराने सामन्याला सुरुवात झाली तरी २० षटकांचाच खेळवण्याचा निर्णय मैदानावरील पंचांनी घेतला. ख्रिल गेल (२२) आणि पार्थिव पटेल (२९) यांनी सावध सुरुवात करून दिल्यानंतर युवराज आणि एबी डी’व्हिलियर्स जोडीने चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. डी’व्हिलियर्सने १७ चेंडूंत चार चौकार आणि एका षटकारासह ३३ धावांची खेळी केली. युवराजने २९ चेंडूत एक चौकार आणि नऊ षटकारांसह नाबाद ६८ धावा वसूल केल्या. युवराजने २०व्या षटकांत लक्ष्मीरतन शुक्लाला चार षटकार लगावले.

संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत ४ बाद १८६ (युवराज सिंग नाबाद ६८, एबी डी’व्हिलियर्स ३३; मोहम्मद शमी १/३१) विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स.