भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंहने संघ व्यवस्थापनाला आपल्या टीकेचं लक्ष्य बनवलं आहे. विश्वचषकात उपांत्य फेरीत विराट कोहलीच्या भारतीय संघाला उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. संपूर्ण स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी कोणी करायची यावर अनेक चर्चा घडत राहिल्या. मात्र एकाही फलंदाजाला या जागेवर आश्वासक कामगिरी करता आली नाही. संघ व्यवस्थापन चौथ्या क्रमांकावरील फलंदाजीच्या समस्येवर उपाय शोधण्यात कमी पडल्यामुळेच भारताच्या पदरी निराशा आली. चौथ्या क्रमांकासाठी योग्य फलंदाज शोधण्यात संघ व्यवस्थापन पूर्णपणे अपयशी ठरलं. चौथ्या क्रमांकासाठी अनेक पर्याय तपासून पाहण्यात आले, मात्र एकाही खेळाडूला संघ व्यवस्थापनाने आपला पाठींबा दिला नसल्याचं युवराजने बोलून दाखवलं.

“चौथ्या क्रमांकावर कोणता फलंदाज खेळायला येणार हे शोधणं गरजेचं होतं. विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर आपल्या फलंदाजांनी काढलेल्या सर्वोत्तम धावा म्हणजे ४८….फलंदाजीत चौथ्या क्रमांकाची जागा ही महत्वाची असते हे कर्णधार, प्रशिक्षकाला माहिती असायला हवं. इंग्लंडमध्ये चेंडू हवेमध्ये प्रचंड वळतो, अशावेळी चौथ्या क्रमांकावर अनुभवी फलंदाज हवाच. चौथ्या क्रमांकावरचा फलंदाज तांत्रिकदृष्ट्या सक्षम असावा. विजय शंकर-ऋषभ पंत काही सामने खेळले, मात्र त्यांच्याकडे पुरेसा अनुभव नाही. दिनेश कार्तिकसारख्या अनुभवी खेळाडूला साखळी सामन्यांमध्ये संघाबाहेर बसवण्यात आलं आणि अचानक उपांत्य सामन्यात त्याला संधी देण्यात आली. संघ व्यवस्थापन नेमकं करत तरी काय होतं? माझ्या मते भारतीय संघाच्या विश्वचषकातील पराभवाचं हे सर्वात मोठं कारण आहे.” युवराजने आपलं परखड मत मांडलं. ‘आज तक’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता.

विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतरही भारतीय संघाचा चौथ्या क्रमांकासाठीच्या फलंदाजाचा शोध अद्याप संपलेला नाहीये. धोनीच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतला भारतीय संघात स्थान देण्यात आलं. मात्र विंडीज पाठोपाठ आफ्रिकेविरुद्ध मालिकेतही ऋषभने फलंदाजीत पुरती निराशा केली. २ ऑक्टोबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार निवड समिती आणि प्रशिक्षक रवी शास्त्री ऋषभच्या खेळावर नाराज असून त्याला अखेरची संधी देण्यात येणार आहे. या मालिकेत चांगला खेळ न दाखवल्यास ऋषभला संघाबाहेर बसवण्याची शक्यताही वर्तवण्यात येते आहे.