भारताचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याने त्याच्या कारकिर्दीत भारताने अनेक सामने जिंकले. त्यातील २००२ साली नॅटवेस्ट मालिकेत अंतिम सामन्यात विस्मयकारक मिळालेला विजय आजही क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात आहे. या विजयाला सोमवारी १८ वर्षे पूर्ण झाली. १३ जुलै २००२ साली भारताचे पाच महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर युवराज-कैफ जोडीने संघाला सामना जिंकवून दिला होता. या विजयानंतर गांगुलीने टी-शर्ट फिरवून सेलिब्रेशन केलं होतं.

विशेष म्हणजे, इंग्लंडला त्यांच्याच भूमीवर भारताने पराभूत केले होते. क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर नॅटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताने केवळ २ गडी आणि ३ चेंडू राखून रोमांचक विजय मिळवला होता. युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ हे भारताच्या विजयाचे खरे शिल्पकार होते. सलामीवीर मार्कस ट्रेस्‍कॉथीक (१०९) आणि कर्णधार नासिर हुसेन (११५) यांच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत ५ बाद ३२५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचे पाच महत्त्वाचे खेळाडू स्वस्तात तंबूत परतले होते. ३ चेंडू शिल्लक असताना ८ विकेट गमावून ३२६ धावा केल्या आणि सामन्यासह विजेतेपद जिंकले. मोहम्मद कैफ (नाबाद ८७) आणि युवराज सिंग (६९) या दोन नव्या दमाच्या फलंदाजांनी संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. याच सामन्यातील काही क्षणचित्रे युवराजने पोस्ट केली. त्यात त्याने त्या सामन्याच्या आठवणीबाबत लिहिले. कॅप्शनमध्ये शेवटी त्याने, “नासिर हुसेन, तू विसरला असशील तर तुला आठवण करून देतो”, असे म्हणते फोटो पोस्ट केले.

नासिर हुसेननेदेखील यावर रिप्लाय दिला. “हे फोटो खरंच खूप सुंदर आहे. तू या आठवणी जागवल्यास त्याबाबत धन्यवाद”, असं उत्तर त्याने दिलं.

दरम्यान, कैफच्या कारकीर्दीतील हा सर्वात अविस्मरणीय डाव ठरला. त्यामुळे त्याने २०१८मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यासाठीही १३ जुलैचीच तारीख निवडली. निवृत्तीची घोषणा करताना त्याने या खेळीचा उल्लेख केला. कैफ-युवराजच्या खेळीसह या विजयानंतर गांगुलीने टी-शर्ट काढून हवेत फिरवत विजय साजरा केला, तो क्षणही कायम स्मरणात राहिला.