टीम इंडियाच्या मधल्या फळीतील तडाखेबाज खेळाडू युवराज सिंग याने आज (सोमवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. देशांतर्गत टी २० लीग स्पर्धांमध्ये मात्र यापुढेही खेळतच राहणार असल्याचे युवराजने स्पष्ट केले. “निवृत्तीचा निर्णय घेणे हे माझ्यासाठी अत्यंत कठीण होते, पण मी माझ्या कुटुंबियांशी चर्चा करून तसेच इतर वरिष्ठ आजी-माजी क्रिकेट सहकारी यांच्याशी चर्चा करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला”, असे युवराजने मुंबईतील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

युवराजने लॉर्ड्सवर नॅटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्यात केलेली खेळी लोकांच्या अजूनही लक्षात आहे. पण त्याला ‘सिक्सर किंग’ अशी उपाधी मिळण्यासाठी त्याने केलेली टी २० विश्वचषक स्पर्धेतील खेळी अजूनही त्याच्या सर्वोत्तम खेळींपैकी एक आहे. पहिल्यावहिल्या टी २० विश्वचषक स्पर्धेत युवराजने हा कारनामा केला होता. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात युवराज मैदानावर आला, तेव्हा अँड्र्यू फ्लिंटॉफ याने त्याला डिवचले, त्यानंतर पुढच्याच षटकात युवराजने स्टुअर्ट ब्रॉड या गोलंदाजाच्या षटकात ‘त्या’ डिवचण्याचा हिशेब चुकता केला आणि ६ चेंडूंवर ६ षटकार लगावले.

त्या सामन्यात त्याने १२ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. ती खेळी त्यावेळी विक्रमी ठरली होती. १२ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक करण्याचा सनथ जयसूर्या याचा टी २० तील विक्रम होता, त्या विक्रमाशी युवराजने बरोबरी केली होती. त्या सामान्यामुळे भारताला एक विजयी सूर गवसला होता आणि भारताने तो विश्वचषक आपल्या नावे केला होता.

पण युवराजला निरोपाचा सामना खेळता आला नाही. सचिन तेंडुलकर ज्या प्रकारे शेवटचा सामना मुंबईच्या मैदानावर खेळला, त्याप्रमाणे तुला शेवटचा सामना स्वतःच्या आवडत्या मैदानावर खेळावासा वाटला नाही का? किंवा तू BCCI ला या बाबतची विनंती केली नाहीस का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना युवराज म्हणाला की मला अशा पद्धतीचे क्रिकेट आवडत नाही. मी कधीच कोणाकडे माझ्या निरोपाचा सामना खेळण्याचा हट्ट धरला नाही. मी यो-यो टेस्ट पास झालो नाही, तर मला निरोपाचा सामना खेळायला मिळेल आणि त्यानंतर मला निवृत्त व्हावे लागेल, असे मला सांगण्यात आले होते. पण मला त्या पद्धतीचा निरोप कधीही नको होता. त्यामुळे मी स्पष्टपणे सांगितले की जर मी यो-यो टेस्ट पास झालो नाही, तर मला कोणीही इतर लोकं सांगण्याआधी मी स्वतःहून घरी निघून जाईन आणि निवृत्ती स्वीकारेन, असे त्याने स्पष्ट केले.