भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ ला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. पृथ्वी शॉ ने आज २१ व्या वर्षात पदार्पण केले. पृथ्वी शॉ सध्या यूएईमध्ये असून त्यांच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सने पहिल्यांदाच आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

या मोसमता पृथ्वी शॉ ला फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्याने १७.५३ च्या सरासरीने १३ सामन्यात २२८ धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या क्वालिफायटर एकमध्ये पृथ्वी शॉ ला संघात स्थान देण्यात आले होते. पण सततच्या अपयशामुळे हैदराबाद विरुद्धच्या क्वालिफायर दोनच्या सामन्यातून त्याला वगळण्यात आले.

आपल्या टि्वटमधून युवराजने खराब फॉर्ममध्ये असलेल्या पृथ्वी शॉ चा उत्साह वाढवण्याचा, चमकदार कामगिरीसाठी त्याला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला आहे.

“प्रतिभासंपन्न पृथ्वी शॉ तू भारताचं वर्तमान आणि भविष्य आहेस. तुला तूझा हरवलेला सूर सापडेल अशी मला अपेक्षा आहे. त्यासाठी मेहनत हा एकमेव मार्ग आहे. आज तुझा दिवस आहे. तू शतक साजरं करतोस, तसा आजचा दिवस साजरा करं” असे युवराजने त्याच्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.


२०१८ साली राजकोटमध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेतून पृथ्वी शॉ ने पदार्पण केले. कसोटीमध्य एक शतक आणि दोन अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत. याचवर्षी न्यूझीलंड दौऱ्यातून त्याने एकदिवसीय संघात पदार्पण केलं. तीन सामन्यात त्याने ८४ धावा केल्या.