कीर्तीच्या शिखरावर असताना निवृत्त होणे हे अधिक उचित असते, असे म्हटले जाते. भारताच्या क्रिकेट क्षेत्रातील महान खेळाडू म्हणून नावलौकिक मिळविलेल्या व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, राहुल द्रविड व अलीकडेच सचिन तेंडुलकर यांनी त्यांच्या चाहत्यांचा विरोध सहन करीत स्पर्धात्मक खेळातून निवृत्ती स्वीकारली. युवराज सिंगनेही त्यांचेच अनुकरण करण्याची वेळ सध्या आली आहे, असे म्हणावे लागेल.
बांगलादेशमध्ये झालेल्या आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. त्या वेळी ‘खलनायक’ म्हणून युवराजवर टीका झाली. युवराज हा त्या पराभवाला एकटा जबाबदार निश्चित नव्हता. त्याच्याचबरोबर अन्य काही कारणेही भारताच्या पराभवाला जबाबदार होती. मात्र अनेकांनी या पराभवाचे मुख्य खापर संथ खेळणाऱ्या युवराजवर फोडले. एका षटकात सहा षटकार ठोकणाऱ्या युवराजकडून असा संथ खेळ होण्याची ही पहिलीच वेळ असेल किंवा असावी. त्यामुळे अंतिम लढतीत त्याच्याकडून असा खेळ झाल्यानंतर चाहत्यांची निराशा होणे स्वाभाविकच होते.
युवराज हा अनेक वेळा संघाला विजय मिळवून देणारा खेळाडू म्हणून ओळखला जातो. यंदाच्या आयसीसी ट्वेन्टी-२० स्पर्धेत त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४३ चेंडूंत ६० धावा केल्या होत्या. या कामगिरीमुळे ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून त्याने विक्रम केला, पण असे असले तरी या स्पर्धेत त्याची कामगिरी अपेक्षेइतकी नव्हती. मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज व फिरकी गोलंदाज तसेच चित्त्याच्या वेगाने झेपावणारा क्षेत्ररक्षक अशी त्याची ख्याती आहे; तथापि गेल्या तीन वर्षांमध्ये त्याच्या कामगिरीत सातत्य राहिलेले नाही.
२०११ मध्ये कर्करोगासारख्या गंभीर आजारावर मात करीत तो पुन्हा क्रिकेट क्षेत्रात ‘फिनिक्स’ पक्ष्याप्रमाणे झेप घेऊही लागला. गंभीर आजार होऊनही त्यास न डगमगता आत्मविश्वासाने सामोरे कसे जायचे, याचा आदर्श त्याने घडवून दिला. याबाबत अनेकांसाठी तो प्रेरणादायी खेळाडूच ठरला आहे. केवळ क्रीडा क्षेत्रासाठी नव्हे, तर अन्य क्षेत्रांमधील व्यक्तींसाठीही तो आदर्श व्यक्ती ठरला आहे.
आजारातून तंदुरुस्त झाल्यानंतर त्याने भारताला काही सामने जिंकूनही दिले आहेत. असे असले तरी संघातील त्याचे स्थान डळमळीतच आहे. २०११मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध चेन्नई येथे शतक झळकावले होते. त्यानंतर एकदिवसीय सामन्यात तो शतक झळकावू शकलेला नाही. कसोटी कारकिर्दीत त्याने २००७नंतर एकही शतक केलेले नाही. आयपीएल स्पर्धेत यंदा त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने तब्बल १४ कोटी रुपयांची जबरदस्त बोली लावून विकत घेतले आहे. सर्वानाच ही गोष्ट आश्चर्याची वाटली आहे, कारण आयपीएल स्पर्धेत युवराजच्या कामगिरीपेक्षाही दुखापती, आजारपण याबाबतच त्याला जास्त प्रसिद्धी मिळाली आहे. आयपीएलमध्ये त्याची कामगिरी खराबच झाली आहे. झंझावाती फटकेबाजी करण्याबाबत ख्याती असलेल्या या खेळाडूला आयपीएलच्या असंख्य चाहत्यांवर अपेक्षेइतके राज्य करता आलेले नाही. २०१२मध्ये आजारपणामुळे तो आयपीएलमध्ये खेळू शकला नव्हता. हा अपवाद वगळता २००८ ते २०१३ या कालावधीत त्याने ६८ सामन्यांमध्ये भाग घेतला. त्यामध्ये त्याने २५.२९च्या सरासरीने १४४२ धावा केल्या आहेत. सर्वाधिक नाबाद ६६ धावा ही त्याची सर्वोच्च कामगिरी ठरली आहे. केवळ पाच अर्धशतके त्याला टोलविता आली आहेत.
सचिन, राहुल व लक्ष्मण यांच्याशिवाय भारतीय संघ अपुराच आहे असे एके काळी समीकरण होते. युवराजबाबतही असेच समीकरण काही काळ होते, मात्र आता भारतीय संघातील प्रत्येक स्थानासाठी भरपूर पर्यायी खेळाडू तयार होऊ लागले आहेत. त्यामुळे युवराज संघात नसला तरी भारतीय संघ विजय मिळवू शकतो आणि तो असला तरी भारतीय संघ पराभव स्वीकारतो हे अनेक वेळा घडले आहे. पूर्वीइतके चापल्य त्याच्या क्षेत्ररक्षणात राहिलेले नाही व त्याची लवकर दमछाक होत आहे हे अलीकडे दिसून येऊ लागले आहे. ३२व्या वर्षी त्याच्याकडून १८ वर्षांच्या खेळाडूइतके कौशल्य अपेक्षित करणे चुकीचे आहे. मात्र आता भारतीय संघात स्थान मिळविण्याच्या उंबरठय़ावर अनेक खेळाडू उभे असताना भविष्यातील संघबांधणीचा विचार करता युवराजऐवजी पर्यायी खेळाडूला संघात स्थान देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मधल्या फळीत त्याची जागा घेऊ इच्छिणारे अनेक फलंदाज सज्ज आहेत.
सचिनने निवृत्त होणे हे कोटय़वधी चाहत्यांसाठी क्लेशदायक होते. तरीही संघाचे हित लक्षात घेऊन व नवोदित खेळाडूंना कारकीर्द घडविण्याची संधी द्यावी या हेतूने सचिन, राहुल, लक्ष्मण यांनी क्रिकेटला रामराम केला. त्यांचाच आदर्श ठेवत युवराजनेही त्यांचे अनुकरण करण्याची वेळ आता आली आहे.