भारतात करोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेने कहर केला आहे. अशा परिस्थितीत मदत करण्यासाठी अनेक मदत निधीची स्थापना केली जात आहे. देशात करोना विषाणूच्या वाढत्या घटनांमुळे आरोग्य विभागाला सुविधा पुरविणे कठीण होत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी करोनाविरुद्धच्या लढ्यात मदत करण्यासाठी शुक्रवारी एक मदत निधी उभारला.

या जोडप्याने २ कोटी रुपयांची देणगी दिली आणि सांगितले की ७ कोटी रुपये संकलित करण्याची त्यांची अपेक्षा आहे. हा निधी देशभरात ऑक्सिजनच्या कमतरतेवर मात करण्यास मदत करेल. भारतीय संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलने पुढे येत या मदतनिधीला ९५,००० रुपयांची देणगी दिली आहे. हरियाणाचा हा लेगस्पिनर कोहलीचा जवळचा मानला जातो. २०१४च्या आयपीएल हंगामापासून हे दोघेही एकत्र आरसीबीचे प्रतिनिधित्व करत आहेत.

 

आयपीएल २०२१चा हंगाम अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्यानंतर चहल घरी परतला आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या कसोटी संघात चहलला स्थान मिळवता आलेले नाही. २०१९च्या विश्वचषक स्पर्धेपासून चहलचा फॉर्म हरवला आहे. आयपीएल २०२१पूर्वी चहलला खराब कामगिरीमुळे भारताच्या टी-२० आणि एकदिवसीय सामन्यातील अंतिम अकरा संघातून वगळण्यात आले होते. आयपीएलच्या या पर्वातही चहलला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याने ७ सामन्यांत केवळ ४ विकेट्स घेतल्या.

खराब फॉर्म असूनही आरसीबीने चहलला सातत्याने संधी दिली. विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी बजावली. आरसीबीने ७ पैकी ५ सामने जिंकले आणि गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले.

आयपीएल २०२१च्या बायो बबलमध्ये करोनाची प्रकरणे नोंदवल्यानंतर बीसीसीआयने ही लीग पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता या लीगचे उर्वरित सामने सप्टेंबरमध्ये घेण्याची योजना आखली जात आहे.