भारतीय क्रिकेट संघासाठी गोलंदाज युजवेंद्र चहलने कोलंबोमधील तिरंगी मालिका निदाहास ट्वेन्टी-२० ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात बांगलादेशचे तीन विकेट्स मिळवत रेकॉर्ड केला आहे. टी-२० च्या अंतिम सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी करणा-यांच्या यादीत युजवेंद्र चहलला स्थान मिळालं आहे. आपल्या जबरदस्त कामगिरीमुळे युजवेंद्र पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. युजवेंद्र चहलने फक्त १८ धावा देत तीन विकेट्स मिळवले. निदाहास ट्रॉफी २०१८ तर्फे टी-२० मधील यशस्वी गोलंदाजांची यादी ट्विट करण्यात आली, यामध्ये युजवेंद्र चहलच्या नावाचाही समावेश आहे.

या लिस्टमध्ये अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी, श्रीलंकेचा मेंडिस, वेस्ट इंडिजचा के एस नरेन, भारताचा इरफान पठाण आणि युजवेंद्र चहल यांची नावे आहेत. यादीत अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने २०१७ मध्ये आयर्लंडविरोधात खेळताना १० धावा देत चार विकेट्स मिळवल्या होत्या. दुस-या क्रमांकावर श्रीलंकेचा मेंडिस आहे ज्याने २०१२ मध्ये वेस्ट इंडिजविरोधात खेळताना १२ धावा देत चार विकेट्स मिळवल्या होत्या. वेस्ट इंडिजचा नरेन तिस-या क्रमांकावर आहे ज्याने २०१२ मध्ये श्रीलंकेविरोधात खेळताना ९ धावा देत तीन गडी बाद केले होते.

चौथ्या क्रमांकावर भारताचा इरफान पठाण आहे, ज्याने २००७ मध्ये पाकिस्तानविरोधात खेळताना १६ धावा देत तीन विकेट्स मिळवले होते. यानंतर पाचव्या क्रमांकावर युजवेंद्र चहलला स्थान मिळालं आहे, ज्याने बांगलादेशविरोधात खेळताना आपल्या जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवत १८ धावा देत तीन विकेट्स मिळवले.

अंतिम सामन्यात बांगलादेश टॉस हारला होता. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत बांगलादेशला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली होती. बांगलादेशने २० ओव्हर्समध्ये १६६ धावा केल्या होत्या. अटीतटीच्या या सामन्यात शेवटच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना दिनेश कार्तिकने षटकार लगावत विजय अक्षरक्ष: खेचून आणला आणि भारताला चॅम्पिअन बनवलं. बांगलादेशकडून सब्बीर रहमानने सर्वात जास्त ७७ धावा केल्या. उनाडकटने त्याची विकेट घेतली. भारतीय संघाकडून युजवेंद्र चहलनंतर उनाडकटने चांगली गोलंदाजी केली. उनाडकटने चार ओव्हर्समध्ये ३३ धावा देत दोन विकेट्स मिळवल्या. मात्र या सामन्याचा खरा हिरो ठरला तो दिनेश कार्तिक.