महेंद्रसिंग धोनी हा कायमच आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. तो कायम नवोदित खेळाडूंना सहकार्य करत असतो. याच बाबतीत भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याने क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी याचे आभार मानले आहेत. ‘स्टंपमागे उभा राहून धोनी गोलंदाजाचे मन ओळखतो. सामन्याच्या वेळी जेव्हा मी काहीसा गोंधळतो. पण अशा मनस्थितीत मी धोनीकडे धाव घेऊन त्याचा सल्ला घेतो, असे तो म्हणाला आहे.

मी काहीसा गोंधळात आहे, ते त्याला समजते. माझी मनस्थितीत धोनीलाही कळते. संघातील कोणताही खेळाडू अडचणीत असेल तर धोनी धावून जातो आणि त्यांना मदत करतो’, अशा शब्दात चहलने धोनीची स्तुती केली.

संघामध्ये एखादा ज्येष्ठ खेळाडू असणे नेहमीच फायद्याचे असते. ज्येष्ठ खेळाडूच्या अनुभवाचा नेहमीच फायदा होतो. कर्णधार विराट कोहलीसुद्धा आपल्या या ज्येष्ठ खेळाडूंकडून नेहमी सल्ला घेत असतो. सध्या या ज्येष्ठ खेळाडूच्या भूमिकेत महेंद्रसिंह धोनी आहे, असे चहल म्हणाला.

आशिया चषक स्पर्धेदरम्यान पाकिस्तानविरोधातील सामन्यावेळी धोनीबरोबरचा एक किस्सा त्याने सांगितला. ‘या सामन्यात रोहित शर्मा कर्णधार होता. धोनीशी चर्चा केल्यानंतर रोहित माझ्याकडे आला आणि मला पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करायला सांगितली. मी धोनीकडे पहिले. धोनी लगेचच माझ्याकडे धावत आला आणि मला स्टम्प टू स्टम्प गोलंदाजी करायला सांगितली. मी तेच केले आणि त्याचा फायदा झाला, असेही तो म्हणाला.