News Flash

…म्हणून टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक होण्याची झहीरची संधी हुकली

झहीर खानने मागितलेल्या मानधनाचा आकडा बीसीसीआयला पटला नाही

Zaheer Khan : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ९२ कसोटी व २०० एकदिवसीय सामन्यांचा झहीरचा प्रदीर्घ अनुभव पाहता हा निर्णय घेण्यात आला होता.

भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याला टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नेमण्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) प्रस्ताव बारगळल्याची माहिती समोर आली आहे. झहीरने मागितलेले मानधन आणि अटी आवाक्याबाहेरच्या असल्याने बीसीसीआयला हा प्रस्ताव गुंडाळावा लागला. सूत्रांच्या माहितीनुसार झहीर खानला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नेमण्यास बीसीसीआय उत्सुक होती. मात्र, त्यासाठी झहीर खानने मागितलेल्या मानधनाचा आकडा बीसीसीआयला पटला नाही. याशिवाय, झहीरने आपल्याला भारतीय संघासह पूर्णवेळ काम करायचे नसल्याचेही स्पष्ट केले होते. त्याने वर्षातील १०० दिवस काम करेन, असे सांगत चार कोटी मानधनाची मागणी केली. मात्र, नियोजित प्रस्तावापेक्षा ही रक्कम जास्त असल्याने बीसीसीआयने झहीरला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नेमण्याचा नाद सोडून दिला. टाइम्स समुहाने याबाबत झहीरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण त्याच्याशी संवाद होऊ शकला नाही.

भविष्यचा विचार करता टीम इंडियाच्या बांधणीसाठी झहीरसह मोठ्या कालावधीचा करार करून गोलंदाजांची ताकद वाढवण्याची बीसीसीआयची योजना होती. मात्र, झहीर खानने मागितलेले मानधन आणि अटी मान्य केल्या असत्या तर हा सौदा बीसीसीआयला खूप महागात पडला असता. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यानेच संघातील वेगवान गोलंदाजांना मार्गदर्शन करण्यासाठी झहीरची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ९२ कसोटी व २०० एकदिवसीय सामन्यांचा झहीरचा प्रदीर्घ अनुभव पाहता हा निर्णय घेण्यात आला होता. यापूर्वी झहीर खानला भारतीय संघाच्या सराव शिबिरांमध्ये गोलंदाजांना मार्गदर्शन करण्यासाठीही विचारणा करण्यात आली होती. पुढील वर्षी भारतीय संघ काही परदेश दौऱ्यांवर जाणार आहे. त्यापूर्वी झहीरकडून भारतीय गोलंदाजांना मार्गदर्शन लाभावे, असा बीसीसीआयचा हेतू होता. मात्र, सरतेशेवटी हा प्रस्ताव गुंडाळावा लागला. आगामी काळात झहीर दुसऱ्या कामांमध्ये व्यग्र असल्याने त्याने पूर्णवेळ गोलंदाजी प्रशिक्षक होण्याची जबाबदारी स्विकारली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 10:37 am

Web Title: zaheer khan misses out on bowling coach deal of team india
Next Stories
1 भारतीय महिला संघाने सहा गुण गमावले
2 ऑस्ट्रेलियाचे गुलाबी दिवस परतणार?
3 अनुपमचा पराक्रम
Just Now!
X