देशातील युवा प्रतिभावंत खेळाडूंसाठी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी भारताचा वेगवान गोलंदाज झहीर खान स्वतंत्र क्रिकेट लीग ‘द फेरिट क्रिकेट बॅश’ची (FCB) सुरुवात करत आहे. या लीगमध्ये १५ वर्षापुढील खेळाडूंना खेळण्याची संधी देण्यात येणार आहे. यासाठी सहा महिन्याचा अवधी लागणार आहे. क्रिकेटमध्ये करिअर घडविण्याच्या दृष्टीने हे चांगले व्यासपीठ आहे, अशी माहिती FCB चे सह-संस्थापक असलेल्या झहीर खानने दिली.

FCB मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात येणार आहे. निवड करण्यात आलेल्या खेळाडूंचे काही संघ यासाठी तयार करण्यात येणार आहेत. स्टार खेळाडू ख्रिस गेल, मुथय्या मुरलीधरन, प्रवीण कुमार आणि अन्य खेळाडू या लीगमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. झहीरने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ‘जे खेळाडू क्रिकेटमध्ये करिअर घडवू इच्छित आहेत, अशा मुलांना हे व्यासपीठ आम्ही उपलब्ध करुन देणार आहोत’, असे त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे.

हे प्रशिक्षण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देण्यात येणार आहे. प्रत्येक राज्यातून १४ ते १६ खेळाडूंची निवड करण्यात येईल, असेही सांगण्यात येत आहे.