भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज झहीर खान याने आता भविष्याचा विचार करायला हवा. या वर्षांच्या उत्तरार्धात भारतीय संघ इंग्लंडच्या खडतर दौऱ्यावर जाणार आहे, त्यामुळे झहीरने भविष्याबाबत विचार करायला हवा, असे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने व्यक्त केले आहे.
दुखापतीनंतर झहीरने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याप्रसंगी भारतीय संघात पुनरागमन केले होते, त्यानंतर तो नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यातही खेळला. या दोन्ही दौऱ्यांमध्ये त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. वेलिंग्टन येथील कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात झहीरने पाच विकेट्स मिळवल्या होत्या, पण त्यासाठी त्याला १७० धावा मोजाव्या लागल्या होत्या. इंग्लंडमधील कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये झहीर खेळू शकेल का, याबाबत मी तरी शाश्वत नाही, असे द्रविडने म्हटले आहे.
‘‘माझ्या मते झहीरने स्वत:लाच हा प्रश्न विचारायला हवा. झहीरला त्याची कारकीर्द कामगिरीशी झगडत संपवावी असे नक्कीच वाटत नसणार. हा निर्णय घेणे नक्कीच फार कठीण असतो. गेल्या दोन मालिकांमध्ये झहीरला झगडावे लागत होते आणि हे आपण साऱ्यांनीच पाहिले आहे. त्यामुळे याबाबत त्याने भारतीय निवड समितीशी चर्चा करायला हवी,’’ असे द्रविड म्हणाला.
झहीरने ९२ कसोटी सामन्यांमध्ये ३११ बळी मिळवले आहेत. कपिल देव यांच्यानंतर सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे.
झहीरची कारकीर्द अशा पद्धतीने कामगिरीशी झगडा करत संपणे आवडणार नसल्याचे सांगताना द्रविड पुढे म्हणाला की, ‘‘कपिल देव यांच्यानंतर भारताला झहीरच्या रूपामध्ये दर्जेदार वेगवान गोलंदाज मिळाला. झहीरला कारकिर्दीच्या शेवटी १२०-१२५ ताशी कि.मी.च्या वेगाने गोलंदाजी करताना कोणालाही पाहावणार नाही. या दोन मालिकांसाठी स्वत:ला तंदुरुस्त ठेवत त्याने चांगली कामगिरी केली, पण त्यामध्ये सातत्य नव्हते, काही ठरावीक वेळाच त्याच्याकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली.