विदेशी खेळपट्टीवर अपयशी ठरण्याचे सत्र न्यूझीलंडने झिम्बाब्वेसारख्या अननुभवी संघाविरुद्धही कायम राखले. झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय लढतीत विश्वचषक उपविजेत्या संघाला ७ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. क्रेग अव्‍‌र्हिनच्या नाबाद १३० धावांच्या झंझावाती खेळाच्या जोरावर झिम्बाब्वेने ३०३ धावांचे अशक्यप्राय आव्हान पार केले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडचा विदेशी खेळपट्टीवरील गेल्या सात सामन्यांतील हा पाचवा पराभव आहे.
लडखडत्या सुरुवातीनंतरही रॉस टेलर (९७) आणि केन विलियम्सन (११२) यांच्या दमदार खेळाच्या बळावर न्यूझीलंडने निर्धारित ५० षटकांत ४ बाद ३०३ धावा चोपल्या. हे आव्हान झिम्बाब्वेच्या खेळाडूंनी स्वीकारले आणि लढाऊ वृत्तीचा नजराणा सादर करून बाजी मारली. सलामीवीर हॅमिल्टन मसकाड्झा आणि चमू चिभाभा यांनी विजयाचा पाया रचला. दोघांनी अर्धशतकी भागीदारी करून इतर फलंदाजांमध्ये जिंकण्याची ऊर्जा निर्माण केली. ही जोडी नॅथन मॅक्युलमने चिभाभाला (४२) त्रिफळाचीत करून संपुष्टात आणली. मात्र त्यानंतर आलेल्या एव्‍‌र्हिनने मसकाड्झाच्या जोडीने १२० धावांची भागीदारी करीत झिम्बाब्वेचा विजयाचा मार्ग सुकर केला, परंतु पुन्हा मॅक्युलमने त्यांच्या विजयात अडथळा निर्माण केला. ९९ चेंडूंत १० चौकारांसह ८४ धावांची खेळी करणाऱ्या मसकाड्झाला त्याने बाद केले.
खेळपट्टीवर जम बसलेल्या एव्‍‌र्हिनने मात्र न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. अटीतटीच्या या सामन्यात आपली विकेट न गमावता त्याने झिम्बाब्वेला हा विजय मिळवून दिला. एव्‍‌र्हिनने १०८ चेंडूंत ११ चौकार व ५ उत्तुंग षटकारांच्या साहाय्याने नाबाद १३० धावांची खेळी केली. शतकवीर एव्‍‌र्हिनला सामनावीराचा किताब देण्यात आला.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड : ५० षटकांत ४ बाद ३०३ (केन विलियम्सन ९७, रॉस टेलर ११२, ग्रँट एलिअट ४३; टिनाशे पन्यांगरा २/५०) पराभूत वि. झिम्बाब्वे : ४९ षटकांत ३ बाद ३०४ (हॅमिल्टन मसकाड्झा ८४, चमू चिभाभा ४२,  क्रेग एव्‍‌र्हिन नाबाद १३०, नॅथन मॅक्युलम ३/६२). सामनावीर : क्रेग अव्‍‌र्हिन