रावळपिंडीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या वन-डे सामन्यात यजमान पाकिस्तानला दुबळ्या झिम्बाब्वेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. निर्धारित वेळेत सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपरओव्हरमध्ये सामना खेळवण्यात आला. यात पाकिस्तानच्या फलंदाजा झिम्बाब्वेच्या जाळ्यात अडकले. विजयासाठी आवश्यक असलेल्या ३ धावांचं आव्हान झिम्बाब्वेने सहज पूर्ण केलं.

नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आघाडीच्या फळीतले फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर ब्रेंडन टेलर आणि सिन विल्यम्स यांनी चौथ्या विकेटसाठी महत्वपूर्ण भागीदारी केली. दोन्ही गोलंदाजांनी पाकच्या गोलंदाजांचा समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. ३ बाद २२ अशी परिस्थिती असताना टेलर आणि विल्यम्स यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. मोहम्मद हसनैनच्या गोलंदाजीवर टेलर ५६ धावा काढून माघारी परतला. मात्र यानंतर मैदानावर आलेल्या वेजली माधवेरे आणि सिकंदर रझा यांनी विल्यम्सला उत्तम साथ देत झिम्बाब्वेला आश्वासक धावसंख्या उभारुन दिली. विल्यम्सनेही नाबाद ११८ धावांची खेळी करत आपली जबाबदारी चोख बजावली. पाकिस्तानकडून मोहम्मद हसनैन ५ तर वहाब रियाझने १ बळी घेतला.

प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या डावाची खराब सुरुवात झाली. सलामीवीर इमाम उल-हक आणि फखार झमान स्वस्तात माघारी परतले. यानंतर कर्णधार बाबर आझमने संघाची बाजू सावरत धडाकेबाज शतकी खेळी केली. परंतू दुसऱ्या बाजूने त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. मधल्या फळीत वहाब रियाझने ५२ धावा करत चांगले प्रयत्न केले, परंतु मुझारबानी व इतर गोलंदाजांच्या माऱ्यासमोर पाकिस्तानी फलंदाजांचे प्रयत्न तोकडे पडले. निर्धारित वेळेत सामना बरोबरीत सुटल्यामुळे सुपरओव्हरमध्ये निकाल घेण्यात आला. यामध्येही मुझारबानीने भेदक मारा करत दोन्ही पाकिस्तानी फलंदाजांना २ धावांत माघारी धाडलं. यानंतर विजयासाठी आवश्यक ३ धावांचं आव्हान झिम्बाब्वेने सहज पूर्ण करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.