झिम्बाब्वेचा कर्णधार हॅमिल्टन मसाकाझाने शुक्रवारी झालेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेन्टी-२० सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. ४२ चेंडूंत ७१ धावांची खेळी करत मसाकाझाने झिम्बाब्वेच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

मसाकाझाने पाच षटकार आणि चार चौकारांची आतषबाजी करत झिम्बाब्वेला अफगाणिस्तानवर पहिला ट्वेन्टी-२० विजय मिळवून आपल्या १८ वर्षांच्या कारकीर्दीची सांगता केली. ‘‘अखेरच्या सामन्यात संघाला विजय मिळवून देणे हा माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे,’’ असे मसाकाझाने सांगितले.

२००१मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मसाकाझाने झिम्बाब्वेच्या यशात मोलाची भूमिका बजावली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटीतच शतक झळकावणारा सर्वात युवा खेळाडूचा विश्वविक्रम त्याने आपल्या नावावर केला होता. पण तीन महिन्यांतच त्याचा हा विक्रम बांगलादेशच्या मोहम्मद अश्रफुलने मोडीत काढला होता. मसाकाझाने ३८ कसोटी, २०९ एकदिवसीय तसेच ६६ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व केले आहे.