वेगवान गोलंदाज तेंदई चताराच्या पाच बळींमुळेच झिम्बाब्वेने पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या क्रिकेट कसोटीत २४ धावांनी विजय मिळविला आणि दोन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत राखण्यात यश मिळवले. विजयासाठी २६४ धावांच्या आव्हानाला सामोरे जाताना पाकिस्तानने ५ बाद १८५ धावसंख्येवर दुसरा डाव पुढे सुरू केला. मात्र चताराच्या प्रभावी माऱ्यापुढे त्यांचा डाव २३९ धावांमध्ये आटोपला. चताराने ६१ धावांमध्ये ५ बळी घेतले. पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हकने झुंजार खेळ करीत नाबाद ७९ धावा केल्या. मात्र त्याची ही खेळी संघाचा पराभव टाळू शकली नाही. पाकिस्तानने पहिल्या कसोटी सामन्यात २२१ धावांनी विजय मिळविला होता. कसोटीचा दर्जा लाभलेल्या संघांविरुद्ध झिम्बाब्वेचा हा पाचवा कसोटी विजय आहे. त्यामध्ये तीन वेळा त्यांनी पाकिस्तानला हरवले आहे. २०००-०१ मध्ये त्यांनी भारताविरुद्धच्या कसोटीत विजय मिळविला होता.