आयसीसीच्या क्रमवारीत तळाशी असलेल्या झिम्बाब्वेचं क्रिकेट बोर्ड आर्थिक संकटात सापडलेलं आहे. यातून बाहेर पडण्यासाठी झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी आयसीसीकडे कर्जाची मागणी केली आहे. या आर्थिक संकटामुळे झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या मालिकेवरही काळे ढग निर्माण झाले आहेत.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजीम सेठी झिम्बाब्वे दौऱ्याबद्दल अजुनही सकारात्मक आहेत. एप्रिल महिन्या अखेरीस आयसीसी झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाला आर्थिक मदत करेल असा, बोर्डाच्या अधिकाऱ्यांना विश्वास आहे. तोपर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत असं सेठी यांनी स्पष्ट केलंय.

झिम्बाब्वे आणि पाकिस्तान या दोन देशांमधली मालिका ऑगस्ट महिन्यात होणार आहे. मात्र कोणत्याही कारणामुळे झिम्बाब्वेच्या संघाने या दौऱ्यातून माघार घेतल्यास पाकिस्तान दुसऱ्या पर्यायांचाा विचार करेल. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड ऑगस्टमध्ये होणाऱ्या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या संघाला सहभागी होण्यासाठीही प्रयत्नशील आहे. पाकिस्तानचा संघ ऑगस्टमध्ये झिम्बाब्वेत २ कसोटी, ५ वन-डे आणि २ टी-२० सामने खेळणार आहे. मात्र त्याआधी निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे सध्या या दौऱ्यावर अनिश्चीततेचं सावट आहे.