खेळ सर्वांना एकत्र आणतो. खेळामुळे देशा-देशांमधील संबंध अधिक सलोख्याचे होतात. पण ट्युनिशियामध्ये झिम्बाब्वेच्या राष्ट्रीय संघाला एका विचित्र प्रसंगाला सामोरे जावे लागले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी दाखल झालेल्या झिम्बाब्वेच्या संघाला ट्युनिशियामध्ये चक्क रस्त्यावर मुक्काम करावा लागला.

रग्बी विश्वचषक स्पर्धेची पात्रता फेरी ट्युनिशिया येथे शनिवारपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी विविध संघांचे खेळाडू ट्युनिशियामध्ये दाखल होत आहेत. या दरम्यान, झिम्बाब्वेचा राष्ट्रीय संघही ट्युनिशियामध्ये दाखल झाला. मात्र या संघातील खेळाडूंवर चक्क रस्त्यावर झोपायची वेळ आली. रग्बीचे जाणकार असलेले एरीक निर्जु यांनी या संबंधीचा फोटो आपल्या वैयक्तिक ट्विटर हॅण्डलवरून पोस्ट केला आणि ट्युनिशिया सरकारच्या ही बाब लक्षात आणून दिली.

त्यांनी त्याच्या ट्विटमध्ये लिहिले की झिम्बाब्वेच्या राष्ट्रीय संघातील खेळाडूंवर काल रात्री (२ जुलै) रस्त्यावर झोपण्याची वेळ आली. हा संघ शनिवारी ट्युनिशिया विरुद्ध होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता सामन्यासाठी ट्युनिशियामध्ये दाखल झाला होता. या पेक्षाही अधिक वाईट म्हणजे, या संघातील खेळाडूना व्हीसाबाबतच्या औपचारिकता पूर्ण करण्यासाठी ठराविक रक्कम जमवता न आल्याने त्यांना विमानतळावरही ६ तास थांबवून ठेवण्यात आले होते.

निर्जु यांच्या या ट्विटनंतर ट्युनिशिया रग्बी विभागाने या खेळाडूंची माफी मागितली. ट्युनिशिया रग्बी संघटनेच्या वतीने जारी केलेल्या अधिकृत माफीनाम्याची प्रतही निर्जु यांनी ट्विट केली आहे.

दरम्यान, झिम्बाब्वे रग्बी संघटनेकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.