अनुभवी अँजेलो मॅथ्यूज (खेळत आहे ८८) आणि कुशल मेंडिस (८०) या दोघांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या बळावर श्रीलंकेने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर ४ बाद २९५ धावांपर्यंत मजल मारली.

झिम्बाब्वेच्या पहिल्या डावातील ३५८ धावांपांसून श्रीलंकेचा संघ अद्याप ६३ धावांनी पिछाडीवर असून मॅथ्यूजच्या साथीने खेळणाऱ्या धनजंय डी सिल्व्हावर (नाबाद ३३) श्रीलंकेचा संघ अवलंबून आहे. सोमवारच्या १ बाद ४२ धावांवरून पुढे खेळताना श्रीलंकेने कर्णधार दिमूथ करुणारत्नेला (३७) दिवसाच्या सुरुवातीलाच गमावले. त्यानंतर मग मेंडिस आणि मॅथ्यूज यांनी तिसऱ्या गडय़ासाठी ९२ धावांची भागीदारी रचून श्रीलंकेला २०० धावांच्या जवळ नेले.

मेंडिस बाद झाल्यानंतर दिनेश चंडिमलसुद्धा (१२) फारशी चमक दाखवू शकला नाही. मात्र मॅथ्यूजने एक बाजू लावून धरल्यामुळे श्रीलंकेच्या आशा कायम आहेत.