पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने जेमतेम चार धावांनी निसटता विजय मिळवला. या सामन्यात भारताचा निम्मा संघ ८७ धावांत माघारी परतला होता. तेव्हा बांगलादेशमधील रडकथा झिम्बाब्वेच्या भूमीवरसुद्धा दिसणार का, अशी शंका निर्माण झाली होती. परंतु बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील पराभवाच्या स्मृती विसरून ‘हरारेत.. मालिका जिंका रे’ अशी भारतीय क्रिकेटरसिकांना आशा आहे. निसटत्या विजयातून धडा घेऊन झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला सामोरे जाण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

तीन एकदिवसीय सामन्यांच्या छोटेखानी मालिकेत भारताकडे जरी १-० अशी आघाडी असली तरी पाहुण्या संघाने त्यांना खडाडून जाग आणली आहे. त्यामुळे भारतीय संघाला दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकण्याची संधी असली तरी हा विजय मिळवणे तितके सोपे नसेल. कागदावर मजबूत वाटणारा भारतीय संघ झिम्बाब्वेचा अपेक्षित सामना करू शकला नाही. भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली. मुरली विजय (१), मनोज तिवारी (२) आणि अजिंक्य रहाणे यांनी कामगिरीत सुधारणा करण्याची नितांत आवश्यकता आहे. अंबाती रायुडूने कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी साकारली, त्याला स्टुअर्ट बिन्नीने चांगली साथ दिली. त्यामुळे भारताला किमान अडीचशे धावसंख्या धावफलकावर लावता आली.
झिम्बाब्वेचा कर्णधार एल्टन चिगुंबुराने नाबाद १०४ धावांची खेळी उभारून झुंजार वृत्तीचे दर्शन घडवले. त्यामुळे हा सामना विलक्षण रोमहर्षक झाला. भारताच्या गोलंदाजांनीही झिम्बाब्वेच्या फलंदाजांवर योग्य अंकुश ठेवला नाही. डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल आणि बिन्नी यांनी मिळून चार बळी घेतले, परंतु अनुभवी हरभजन सिंगला मात्र आपला प्रभाव दाखवता आला नाही.
संघ- भारत : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रॉबिन उथप्पा (यष्टीरक्षक), मुरली विजय, स्टुअर्ट बिन्नी, मनोज तिवारी, हरभजन सिंग, केदार जाधव, धवल कुलकर्णी, भुवनेश्वर कुमार, मनीष पांडे, अक्षर पटेल, अंबाती रायुडू, संदीप शर्मा, मोहित शर्मा.
झिम्बाब्वे : एल्टन चिगुंबुरा (कर्णधार), रेगिस चाकाबवा (यष्टीरक्षक), चामू चिभाभा, ग्रॅमी क्रेमर, नेव्हिले मॅडझिव्हा, हॅमिल्टन मासाकाझा, रिचमाँड मुटुंबामी (यष्टीरक्षक), तिनाशे पॅनयांगारा, सिकंदर रझा, डोनाल्ड तिरिपानो, प्रॉस्पर उत्सेया, ब्रायन व्हिटोरी, माल्कम वॉलर आणि सीन विल्यम्स.
वेळ : दुपारी १२.३० वा. पासून.
थेट प्रक्षेपण : टेन क्रिकेट वाहिनीवर.