रेयाल माद्रिदला सलग तीन वर्षे युएफा चॅम्पियन्स फुटबॉल लीगचे विजेतेपद मिळवून देणारे प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांचे पुन्हा एकदा प्रशिक्षकपदी पुनरागमन झाले आहे. स्वत: झिदानने याची घोषणा करत उर्वरित ११ सामन्यांत संघाकडून दमदार कामगिरी घडवून आणण्याचा निर्धार बाळगला आहे.

शनिवारी झालेला सेल्टा विगोविरुद्धचा सामना हा झिदानचा प्रशिक्षकपदी पुन्हा रुजू झाल्यानंतरचा पहिला सामना होता. बार्सिलोनाविरुद्ध सलग तीन सामन्यांतील मानहानीकारक पराभव, तसेच चॅम्पियन्स लीगमधून आव्हान संपुष्टात आले असले तरी ला लीगा, कोपा डेल रे यांसारख्या स्पर्धेत अद्यापही माद्रिदला विजेतेपदाची संधी आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डोने संघाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर गॅरेथ बेल आक्रमणाची धुरा समर्थपणे सांभाळत होता. मात्र दुखापतीमुळे त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याशिवाय बेल व झिदान यांच्यात मतभेद असल्याचेही गतवर्षी निदर्शनास आले होते, त्यामुळे झिदान पुन्हा संघाची सांगड कशा प्रकारे घालतो, हे पाहणे रंजक ठरेल.