१९०२ साली सुरु झालेला ‘रिअल माद्रिद’ हा फुटबॉल जगतातील अत्यंत नावाजलेला फुटबॉल क्लब आहे. परंतु सध्या या क्लबची अवस्था छिद्र पडत चाललेल्या नावेसारखी झाली आहे. एका विजयाचा आनंद मिळतो ना मिळतो तोच पुढे त्यांना पराभवाचा सामना करावा लागतो. त्यामुळे ते प्रवास करत असलेली नाव सतत डुलतेय.

‘कोपा डेल रे’, ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ तसेच त्यांच्या होमग्राऊंडवर ‘ला लिगा’मध्ये देखिल त्यांना अपेक्षित कामगिरी बजावता आली नाही. या अपयशाचे खापर कुणावर तरी फुटणे साहजिक होते. पण साहजिक वाटणारे खापर प्रशिक्षक ‘झिनेदिन झिदान’ यांच्यावर फुटू लागले. सातत्याने होणारा पराभव व प्रत्येक पराभवानंतर त्यांच्या मार्गदर्शनावर उपस्थित केले जाणारे प्रश्न यामुळे वैतागलेल्या ‘झिनेदिन झिदान’ यांनी अखेर आपल्या पदाचा राजिनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. चॅम्पियन ट्रॉफीनंतर ते ‘रिअल माद्रिद’चा निरोप घेणार आहेत.

४५ वर्षीय झिदान अत्यंत नावाजलेले फुटबॉलपटू आहेत. २०१६ मध्ये त्यांनी ‘रिअल माद्रिद’च्या प्रशिक्षक पदाची धुरा हाती घेतली. दरम्यान त्यांनी १४९ पैकी १०४ सामने जिंकवले. तर फक्त १६ सामन्यात त्यांना पराभव स्विकारावा लागला. परंतु मोक्याच्या क्षणी ‘कोपा डेल रे’ व ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ सारख्या नामांकीत स्पर्धांमध्ये ‘रिअल माद्रिद’ला अपेक्षित कामगीरी करता आली. परिणामी त्यांच्यावर दबाव वाढत गेला. आणि त्यांनी शेवटी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

माझे या क्लबवर खुप प्रेम आहे. या क्लबला जिंकवण्यासाठी मी शक्य होते तेवढे प्रयत्न केले. परंतु आता या क्लबला एका नविन प्रशिक्षकाची गरज आहे. त्याच्या नविन कल्पना ‘रिअल माद्रिद’ला आणखीन उंचीवर नेउ शकतील. अशा भावना ‘झिनेदिन झिदान’ यांनी व्यक्त केल्या आहेत.