झिदान आणि माद्रिदच्या विजयी मार्गात युव्हेंट्सचा अडथळा; चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेची अंतिम लढत रविवारी

चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेचे जेतेपद पटकावून युरोपाची मक्तेदारी आपल्याकडे कायम राखण्यासाठी रिअल माद्रिद क्लब सज्ज झाला आहे. मात्र, माद्रिद आणि प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांच्या मार्गात युव्हेंट्स क्लबचा अडथळा आहे. रविवारी होणाऱ्या या लढतीला ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. चॅम्पियन्स लीगच्या इतिहासात आत्तापर्यंत कोणत्याही संघाला आणि प्रशिक्षकाला जेतेपद कायम राखण्यात यश मिळालेले नाही. माद्रिद व झिदान यांना हा विक्रम करण्याची संधी आहे.

लंडन येथील कार्डिफ येथे होणाऱ्या या लढतीत सर्वाचे लक्ष असेल ते झिदान यांच्यावर. १७ महिन्यांच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात झिदान यांच्या मार्गदर्शनाखाली माद्रिदने नुकताच ला लिगा स्पध्रेचा जेतेपदाचा दुष्काळ संपवला. तत्पूर्वी, चॅम्पियन्स लीग, युएफा सुपर चषक आणि फिफा क्लब विश्वचषक स्पध्रेचे जेतेपदही नावावर केले आहेत. त्यामुळे रविवारच्या लढतीत त्यांच्याकडून गत मोसमातील कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा आहे. ‘‘मी युव्हेंटससोबत पाच वष्रे खेळलो आहे आणि त्यांच्यासोबतच्या न विसरणाऱ्या आठवणी स्मरणात आहेत. ही अंतिम लढत माझ्यासाठी विशेष आहे,’’ असे मत झिदान यांनी व्यक्त केले.

माद्रिदने २०१४ व २०१६च्या अंतिम लढतीत अ‍ॅटलेटिको माद्रिदवर विजय मिळवला होता. ते पुढे म्हणाले की, ‘‘आम्ही चॅम्पियन्स लीगची सलग दोन जेतेपद नावावर करण्याच्या विक्रमाच्या उंबरठय़ावर आहोत आणि अशी कामगिरी करणारे आम्ही पहिलेच ठरू, परंतु अजूनही आम्ही सामना जिंकलेला नाही.’’

खेळ आकडय़ांचा

  • ०१ : झिनेदिन झिदान आणि सेर्गिओ रामोस यांना अनुक्रमे प्रशिक्षक व कर्णधार म्हणून चॅम्पियन्स लीगची सलग जेतेपद पटकावण्याची संधी आहे.
  • ५०० :चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेत ५००वा गोल नोंदवण्यासाठी रिअल माद्रिदला केवळ एका गोलची आवश्यकता आहे. हे शिखर गाठणारा हा पहिलाच क्लब ठरेल.
  • १०० : युव्हेंट्स संघाला खेळाडू डॅनी अ‍ॅल्व्हेस यालाही युरोपियन लीग स्पध्रेत शतक झळकावण्याची संधी आहे. माद्रिदविरुद्धची लढत ही त्यांची युरोपियन लीगमधील शंभरावी लढत असणार आहे आणि अशी कामगिरी करणारा तो ३१वा खेळाडू ठरणार आहे.
  • २००८ : चॅम्पियन्स लीग स्पध्रेच्या उपांत्य फेरीच्या परतीच्या लढतीत रिअल माद्रिदला अ‍ॅटलेटिकोकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र युव्हेंटसने एकही सामना न गमावता अंतिम फेरीत प्रवेश केला आणि जर त्यांनी उद्या जेतेपद पटकावले अपराजित राहून जेतेपद जिंकणारा मँचेस्टर युनायटेडनंतरचा (२००८ साली) तो पहिलाच संघ ठरणार आहे.
  • ०६ : माद्रिद आणि युव्हेंट्स हे दोन्ही क्लब सहाव्यांदा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत खेळणार आहेत. त्यांनी एसी मिलान क्लबच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

वेळ : मध्यरात्री १२:१५ वा.पासून; थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स एसडी व एचडी, सोनी ईएसपीएन एसडी व एचडी, टेन १ एचडी, टेन २