मँचेस्टर युनायटेड सारख्या प्रतिष्ठीत क्लबला रामराम करुन, लॉस अँजलीस गॅलेक्सी संघाकडून खेळणाऱ्या झ्लाटान इब्राहीमोव्हीचने मोठ्या दिमाखात आपल्या नवीन प्रवासाची सुरुवात केली आहे. नवीन क्लबकडून आपला पहिला सामना खेळताना इब्राहीमोव्हीचने ४० यार्डावरुन अचुक निशाणा साधत केलेल्या गोलची सध्या क्रीडा क्षेत्रात चांगलीच चर्चा रंगलेली आहे. इब्राहीमोव्हीचच्या संघाने आपल्या प्रतिस्पर्धी संघाला ४-३ असं अटीतटीच्या लढतीत पराभूत केलं.

नवीन क्लबकडून पहिला सामना खेळणाऱ्या इब्राहीमोव्हीचने आपल्या धडाकेबाज गोलने संघाला आघाडी मिळवून दिली. प्रतिस्पर्धी संघाचा गोलकिपर टायलर मिलरही इब्राहीमोव्हीचने झळकावलेल्या गोलमुळे पुरता गोंधळलेला पहायला मिळाला. हा गोल झळकावल्यानंतर इब्राहीमोव्हीचने आपल्या नेहमीच्या शैलीत गोल झळकावत आनंद व्यक्त केला.

“सामन्यादरम्यान प्रेक्षक माझ्या नावाचा जयघोष करत होते, त्यामुळे मी देखील त्यांना निराश होऊ दिलं नाही. ते ज्या झ्लाटानचा खेळ बघण्यासाठी मैदानात आले होते, तो झ्लाटान त्यांना दिसला यात मला आनंद आहे. आतापर्यंत मी ज्या नवीन संघाकडून खेळलो आहे, त्या पहिल्या सामन्यात मी गोल केला आहे. त्यामुळे या सामन्यातही मला ही परंपरा कायम ठेवायची होती.” सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत इब्राहीमोव्हीचने प्रेक्षकांचे आभार मानले.