भारताच्या विश्वनाथन आनंद याने अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा याच्यावर शानदार विजय मिळवित झुरिच क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत चौथ्या फेरीअखेर आघाडी घेतली. त्याचे आता सहा गुण झाले आहेत.
नाकामुरा हा पाच गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अर्मेनियाच्या लिवॉन अरोनियन याने इटलीच्या फॅबिआनो कारुआना याला बरोबरीत रोखले, तर व्लादिमीर क्रामनिक या रशियन खेळाडूने आपला सहकारी सर्जी कर्जाकिन याच्याविरुद्ध बरोबरी स्वीकारली. क्रामनिक याचे चार गुण झाले आहेत. अरोनियन, कारुआना व कर्जाकिन यांचे प्रत्येकी तीन गुण आहेत.
नाकामुरा याने नुकतीच जिब्राल्टर ग्रां.प्रि. स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे आनंदविरुद्ध त्याचे पारडे जड मानले जात होते. तथापि आनंदने त्याच्याविरुद्ध क्वीन्स गॅम्बिट तंत्राचा सुरेख खेळ केला. सुरुवातीपासून कल्पक चाली करीत आनंदने हळूहळू डावावरील पकड मजबूत केली. त्यामुळे नाकामुराच्या वजिराचे बाजूवर खूप दडपण आले. त्याचा फायदा घेत आनंदने हा डाव ४१ व्या चालीस जिंकला.
डाव झाल्यानंतर आनंद म्हणाला, या डावात माझा खेळ मनासारखा झाला. नाकामुरा हा अतिशय नैपुण्यवान खेळाडू आहे. त्याच्याविरुद्धचा विजय माझे मनोधैर्य उंचावणारा आहे.