Lalit Modi interview Dawood Ibrahim IPL: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे माजी आयुक्त ललित मोदी यांनी अलिकडे मुलाखतींचा सपाटाच लावला आहे. या मुलाखतींमध्ये मोदी खळबळजनक खुलासे करत आहेत. नुकतेच मोदींनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमकडून मिळालेल्या धमकीचा उल्लेख केला. क्रिकेटमधून कायमस्वरूपी निवृत्त घेण्यामागे दाऊद इब्राहिम आणि त्याच्या टोळीकडून येणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्या एक प्रमुख कारण असल्याचा खुलासा त्यांनी केला.

बेटिंगमध्ये डी-कंपनीचा शिरकाव

ललित मोदी यांनी आयपीएलमध्ये सुरु झालेल्या बेटिंगवर भाष्य करताना त्यात डी-कंपनीचा शिरकाव आणि त्यांनी मिळवलेल्या नियंत्रणाचा उल्लेख केला. मॅक्स फिक्सिंगविरोधात घेतलेली कठोर भूमिका आणि यानंतर डी-कंपनीने अब्जावधी डॉलर बेटिंग साम्राज्यावर नियंत्रण मिळवल्याचे मोदी म्हणाले. मोठ्या प्रमाणावर विस्तारलेल्या ‘सट्टा बझार’मध्ये डी-कंपनीचे सिडिंकेट सक्रिय झाल्याचे मोदींनी नमूद केले. “दाऊद इब्राहिम एक प्रसिद्ध बुकी आहे. क्रिकेटच्या सट्टेबाजीवर त्याचे नियंत्रण होते. त्या काळात २ अब्ज डॉलर्सची छुपी सट्टेबाजी व्हायची. आज प्रत्येक सामन्यामागे ४ अब्ज डॉलर्सची छुपी सट्टेबाजी होते. हे प्रचंड मोठं जाळं आहे. अकल्पनीय आहे. प्रत्येक चेंडूवर काहीतरी विचित्र शक्यता असते. हा सट्टा बाजार आहे. आता कोणीही सामने ठरवून देत नाही. तुम्ही षटकं ठरवता. तुम्ही चेंडू ठरवता,” असे ललित मोदींनी ANI च्या मुलाखतीत उघड केले.

अशी व्हायची ऑन-फिल्ड ‘स्पॉट-फिक्सिंग’

ललित मोदींनी यावेळी ऑन-फिल्ड गुप्त संकेतांद्वारे सट्टेबाज कशा सिग्नल्सचा वापर करतात यावर देखील भाष्य केले. मोदींनी गुप्त संकेतांद्वारे ठराविक चेंडू किंवा विशिष्ट ओव्हर्सना लक्ष्य करून अत्याधुनिक ‘स्पॉट-फिक्सिंग’ पद्धती वापरल्या जातात याची माहिती दिली. “कोणीतरी खिशातून रुमाल काढतो, कोणीतरी एखादी वस्तू उलट्या बाजूने घासतो. असे संकेत असतात, आम्ही या संकेतांवर बारीक लक्ष ठेवतो. आम्ही या खुणा शोधत असतो,” असे मोदींनी स्पष्ट केले. “यावर पाळत ठेवून कारवाई करण्यास सुरुवात केली व सहकार्य करण्यास नकार दिला, म्हणूनच अंडरवर्ल्ड माफियांकडून धमक्या येऊ लागल्या”, असा खुलासा मोदींनी केला.

दाऊदकडून २०१२ मध्ये धमकी

“मी चालवत होतो त्या ​पहिल्या तीन वर्षांच्या काळत कोणतेही फिक्सिंग नव्हते”, असेही मोदी म्हणाले. अनेक लोकांच्या स्टेडियममध्ये येण्यावर मी बंदी घातली. माफिया गुंडांना ही गोष्ट अजिबात आवडली नव्हती,” असे सांगत त्यांनी कोट्यवधी डॉलर्सच्या लाचेच्या ऑफर धुडकावून लावल्याचाही उल्लेख केला. ललित मोदी यांनी २०१२ मधील घटनाक्रमाची आठवण करून देताना एका प्रसंगाचा उल्लेख केला. लंडनस्थित एका फिक्सरने ‘बाबा’ नावाच्या एका मध्यस्थाच्या पेंटहाऊसमध्ये मध्यरात्री बैठक आयोजित केली होती. या बैठकीदरम्यान, त्या मध्यस्थाने टेरेसवरून थेट सॅटेलाइट फोनद्वारे डॉन दाऊद इब्राहिमला फोन लावला आणि मोदींवर आयपीएल फ्रँचायझी मिळवून देण्यासाठी दबाव आणण्याच्या उद्देशाने तो फोन स्पीकरवर ठेवला, असा खळबळजनक खुलासा मोदींनी केला.

नेमकं घडलं काय? मोदींनी सर्व सांगितले

“मला पहाटे ३.३० वाजता बोलावण्यात आले. तो म्हणाला, तुला या बाबा नावाच्या माणसाला भेटायला यावे लागेल. काहीतरी महत्त्वाचे असेल, म्हणून मी बाबाच्या घरी गेलो. तिथे तो म्हणाला, तू भारत सोडला आहेस, आम्हाला एक आयपीएल टीम हवी आहे. मी म्हणालो, तुम्हाला आयपीएल टीम कशासाठी हवी आहे? ज्याला कोणाला ती खरेदी करायची आहे, तो जाऊन दुसऱ्या कोणाकडूनही खरेदी करू शकतो. शिवाय, मी भारतात परतही जाणार नाहीये; तिथे दाऊदची मोठी समस्या आहे. त्यावर तो म्हणाला, मी एका मिनिटात ते मिटवून टाकतो.” “​त्यानंतर मध्यस्थ त्याच्या टेरेसवर गेला, त्याने सॅटेलाइट फोन काढला आणि थेट दाऊद इब्राहिमला फोन लावला. बाबा म्हणतो, ‘दाऊद भाई, ललित भाई आया है. बात करो.’ मी म्हणालो, मी बोलणार नाही. त्यामुळे त्याने तो फोन स्पीकरवर टाकला. मी पुन्हा म्हणालो, मी बोलणार नाही. त्यावर तो (दाऊद) फक्त इतकंच म्हणाला, तू त्याचा मित्र आहेस, सगळं विसरून जा, आता सगळं संपलं आहे,” असा खुलासा ललित मोदी यांनी केला.

हत्येचे अनेक प्रयत्न झाल्याचा खुलासा

“दाऊदबरोबर झालेले संभाषण मुंबई पोलिसांनी रेकॉर्ड केले होते”, असे मोदी म्हणाले. “हे संभाषण मुंबई पोलिसांच्या गुप्तचरांनी पकडले होते. मुंबई पोलिसांनी मला अचानक झेड-सुरक्षा दिली, जी मी मागितली नव्हती. अचानक मला झेड-सुरक्षा मिळाली. मुंबईत माझ्या घराबाहेर गोळीबार झाला. जोहान्सबर्गमध्ये माझ्यावर हल्ल्याचा कट रचला गेला होता; आणि मी केपटाऊनमध्ये असताना दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने तो कट उधळून लावला. मॉन्टेनिग्रोमध्ये माझ्यावर हल्ला करण्याची योजना होती, जी क्रोएशियन सीमेवर पकडली गेली. लंडनमध्ये स्लोन स्ट्रीटवर माझ्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. पार्क स्ट्रीटवर राहणाऱ्या बाबा अविन नावाच्या एका माणसाने हे केले,” असा दावा मोदींनी केला.

क्रिकेट कायमस्वरुपी सोडण्याचे आश्वासन

अंडरवर्ल्डच्या रोषामुळे आयपीएलचा दुसरा हंगाम दक्षिण आफ्रिकेत स्थलांतरित करावा लागला. यामुळे या स्पर्धेवर करोडोंचा सट्टा लावणाऱ्या सिंडिकेटचे मोठे नुकसान झाले होते, असेही मोदी म्हणाले. माफियांचे ललित मोदींसोबतचे वाद आता मिटले आहेत, असे अंडरवर्ल्ड सिंडिकेटचा टॉप ऑपरेटर छोटा शकील याने एका लाइव्ह मुलाखतीत सांगितल्याचेही मोदी म्हणाले. क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे आश्वासन त्यावेळी दिल्याचा खुलासाही मोदींनी केला. “मी फक्त इतकंच म्हणालो की मी क्रिकेटमधून निवृत्त होईन. मी निवृत्त होण्याचा शब्द दिला. हेच त्यामागील सर्वात मोठ्या कारणांपैकी एक आहे”, असे मोदींनी स्पष्ट केले.