पीटीआय, ओस्लो: गेल्या फेरीत केलेल्या निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय खेळाडूंनी नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत चमक दाखवताना जेतेपदाच्या आपल्या आशा कायम ठेवल्या आहेत. जगज्जेता दोम्माराजू गुकेश आणि आर. प्रज्ञानंद यांनी खुल्या गटात महत्त्वपूर्ण विजय नोंदवले, तर महिला विश्वचषक विजेत्या दिव्या देशमुखने भारताच्याच कोनेरू हम्पीला नमविले. स्पर्धेच्या सहाव्या फेरीत चारही भारतीय खेळाडूंना पराभूत व्हावे लागले होते.
गुकेशने अमेरिकेचा ग्रँडमास्टर वेस्ली सो याला नमवीत १.५ गुणांची कमाई केली. पारंपरिक (क्लासिकल) प्रारूपात संधी गमाविल्यानंतर ‘आर्मागेडॉन’ डावात गुकेशने वेस्लीला नमवीत आठ गुणांपर्यंत मजल मारली. मात्र सहा खेळाडूंच्या गुणतालिकेत तो तळाशी आहे. प्रज्ञानंदने फ्रान्सचा ग्रँडमास्टर अलिरेझा फिरुझाविरुद्ध सलग दुसर्यांदा पारंपरिक प्रारूपात विजय साकारत पूर्ण तीन गुण मिळवले. प्रज्ञानंदचे आता नऊ गुण झाले आहेत. यानंतर प्रज्ञानंद पाचव्या स्थानी आहे. स्पर्धेच्या अजून तीन फेर्या शिल्लक असून भारतीय खेळाडूंना शीर्ष स्थानी पोहोचण्याची संधी आहे.
वेस्ली सो १२.५ गुणांसह गुणतालिकेत अग्रस्थानी आहे, तर फिरुझा १० गुणांसह दुसर्या स्थानी आहे. प्रज्ञानंद, जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणारा मॅग्नस कार्लसन आणि जर्मनीचा व्हिन्सेंट केमेर या सर्वांचे समान नऊ गुण आहेत. सात जेतेपदे मिळविणार्या कार्लसन आणि केमेर यांच्यातील प्रारंपरिक प्रारूपातील डाव बरोबरीत सुटला. यानंतर झालेल्या ‘आर्मागेडॉन’ डावातही या दोघांमधील बरोबरी कायम राहिली.
पांढर्या मोहर्यांसह खेळणारा गुकेश चांगला खेळ करीत भक्कम स्थितीत होता. मात्र वेळेचे गणित साधता न आल्याने त्याला पारंपरिक प्रारूपात बरोबरीवर समाधान मानावे लागले. मात्र जगज्जेत्या गुकेशने ‘आर्मागेडॉन’ डावात वेस्ली सो याला कोणतीच संधी न देता विजय साकारला. अन्य लढतीत, पांढर्या मोहर्यांसह खेळणार्या प्रज्ञानंदने २६व्या चालीत एक अतिरिक्त मोहरे जिंकून चांगली स्थिती मिळविली. त्यामुळे फिरुझावर दबाव वाढत होता.
अशा स्थितीत प्रज्ञानंदने फिरुझाला कोंडीत पकडले. प्रज्ञानंदच्या आक्रमक खेळापुढे फिरुझाला बचावाची फारशी संधी मिळाली नाही.
गुकेशकडे सिंदारोवपेक्षा अनुभवाची बाजू सरस -कुलझाक
सध्याचा जागतिक विजेता दोम्माराजू गुकेश या वर्षाच्या अखेरीस होणार्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आपले जेतेपद राखण्यासाठी प्रबळ दावेदार असल्याचे मत नॉर्वे चेसच्या मुख्य पंच असलेल्या ॲनेमोन कुलझाक यांनी व्यक्त केले आहे. सर्वोच्च पातळीवरील बुद्धिबळ सामन्यांचे पर्यवेक्षण करण्याचा अनेक वर्षांचा अनुभव कुलझाक यांच्या गाठीशी असून, ते कधीही निष्कर्षावर घाईघाईने शिक्कामोर्तब करत नाहीत, अशी त्यांची ख्याती आहे. त्यामुळेच त्यांच्या या मताला विशेष महत्त्व येते. जावोखिर सिंदारोवकडेही अनुभव आहे, परंतु एक जागतिक विजेता म्हणून गुकेशकडे अधिक अनुभव आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
दिव्याची हम्पीवर सरशी
दिव्या देशमुखने हम्पीला ‘आर्मागेडॉन’ डावात नमवीत आपली स्थिती भक्कम केली. पुढच्या फेरीत दिव्यासमोर अग्रस्थानी असणार्या बिबिसारा असाउबायेवाचे आव्हान असेल. दिव्याने या डावात विजय नोंदवल्यास ती गुणतालिकेत आघाडी घेऊ शकते. दिव्या व हम्पी यांच्यातील पारंपरिक प्रारूपातील डाव बरोबरीत सुटल्यानंतर ‘आर्मागेडॉन’मध्ये दिव्याने चमक दाखवली. विशेष म्हणजे दिव्या ही काळ्या मोहर्यांसह खेळत होती. बिबिसाराने आपली लय कायम राखताना पारंपरिक डावात झू जिनेरला नमवीत तीन गुणांची कमाई केली. बिबिसाराचे आता १२.५ गुण झाले असून दिव्याचे १० गुण आहेत. तर झू वेन्जूनला ‘आर्मागेडॉन’डावात ॲना मुझिचूकडून पराभवाचा सामना करावा लागला.
