बँकॉक : भारताची तारांकित बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूचा शनिवारी थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत चीनच्या ऑलिम्पिक विजेत्या चेन यू फेईने सरळ गेममध्ये पराभव केला. तिसऱ्या मानांकित चेनने ४३ मिनिटे चाललेल्या लढतीत जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावरील सिंधूला २१-१७, २१-१६ असे पराभूत केले. सहाव्या मानांकित सिंधूची या सामन्यापूर्वी चेनविरुद्धची कामगिरी ही ६-४ अशी सरस होती; परंतु या लढतीत सिंधूला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. सिंधूला याआधी जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावरील चेनने २०१९च्या ‘बीडब्ल्यूएफ’ जागतिक मालिकेच्या अंतिम टप्प्यामध्ये पराभूत केले होते.

या हंगामात सिंधूने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय आणि स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले, तर आशिया बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळवले. यानंतर सिंधू जकार्ता येथे ७ ते १२ जूनदरम्यान होणाऱ्या इंडोनेशिया मास्टर्स ‘सुपर ५००’ स्पर्धेत सहभागी होणार आहे.